अखिलेशइतका अपमान कोणीच केला नाही : मुलायमसिंह 

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

हे खरे आहे. की जो स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही. तो दुसऱ्या कोणाचा होऊ शकत नाही.

लखनौ : समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव व त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्यातील कौटुंबिक वाद पुन्हा उफाळून आला आहे. इतरांपेक्षा अखिलेशनेच आपला सर्वाधीक अपमान केल्याचे वक्तव्य मुलायमसिंह यांनी केले आहे. 

मणिपुरी येथील एका हॉटेलच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मुलायमसिंह म्हणाले, ''2012 मधील निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील जनतेने आपल्याला पाहून मतदान केले. तरीही आपण अखिलेश यास मुख्यमंत्री बनविले. देशाच्या इतिहासात असा कोणता नेता झाला नाही. जो स्वतः राजकारणात सक्रिय असताना मुलाला मुख्यमंत्रिपद बहाल करेल. मात्र अखिलेशने त्याची जाण ठेवली नाही. त्याने वारंवार आपला व बंधू शिवपाल यादव यांचा अनादर केला.'' 

स्वतःच्या वडिलांचा अनादर करणारा जनतेची काय सेवा करणार, असे मोदींनी कन्नोज येथील सभेत केलेले वक्तव्य हे समाजवादी पक्षाच्या पराभवाचे मोठे कारण बनले. अखिलेश याने आपला किती अपमान केला, तरी आपण काही बोलणार नाही. सपची कॉंग्रेससोबतची आघाडी ही आपल्यासाठी एक दुःखद घटना होती. असेही मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले. 

जो स्वतःच्या बापाचा झाला नाही... 
स्वत:च्या वडिलांना ज्याने अपमानित केले. तो जनतेशी कसा प्रामाणिक राहील, या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याचा दाखला मुलायमसिंह यांनी बोलताना दिला. ते म्हणाले, हे खरे आहे. की जो स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही. तो दुसऱ्या कोणाचा होऊ शकत नाही.

Web Title: No one humiliated me more than Akhilesh, says Mulayam Singh Yadav