चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ; कारागृहातील मुक्काम वाढला

पीटीआय
Thursday, 19 September 2019

आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी आरोप असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयाने तीन ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली आहे.

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी आरोप असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयाने तीन ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली आहे. न्यायाधीशांनी त्यांच्या वैद्यकीय तपासणीलाही परवानगी दिली आहे. 

चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केली होती. चिदंबरम यांना सर्वप्रथम तुरुंगात पाठविले, त्या वेळच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत काहीही फरक पडला नसल्याने न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवून द्यावी, असे सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले.

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार? उद्या महत्वाची बैठक

मेहता यांच्या मागणीला चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र याला विरोध केला. चिदंबरम यांना विविध आजार असून त्यांचे वजनही कमी झाले आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी आवश्‍यक आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. यावर मेहता यांनी कायद्याअंतर्गत चिदंबरम यांच्यावर सर्व उपचार, तपासण्या केल्या जातील, असे सांगितले. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत तीन ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No relief for P Chidambaram judicial custody extended for 14 days to remain in Tihar till Oct 3