दिल्लीतील चार रेल्वे स्थानकांवर वापरणार सौरउर्जा! 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही चारही स्थानके वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या छतांवर सौरउर्जेची उपकरणे बसवून कर्बवायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल लवकरच टाकण्यात येणार आहे. या सौरउर्जा उपकरणांची पाच मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असेल. 

या चार रेल्वे स्थानकांमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानक, हजरत निजामुद्दीन स्थानक, जुनी दिल्ली स्थानक आणि आनंद विहार या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवरील सौरउर्जेसाठी उत्तर रेल्वेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निविदा मागविल्या होत्या. नियोजनानुसार, नवी दिल्ली स्थानकावर 1.1 मेगावॅट वीजनिर्मितीची उपकरणे बसविली जातील. हजरत निजामुद्दीन स्थानकावर 0.6 मेगावॅट, जुनी दिल्ली स्थानकावर 2.2 मेगावॅट आणि आनंद विहार स्थानकावर 1.1 मेगावॅट इतक्‍या क्षमतेची उपकरणे बसविली जातील. 

अर्थात, 'या प्रकल्पामुळे त्या स्थानकाची वीजेची गरज पूर्णपणे भागणार नाही. पण यातून त्या स्थानकांची बहुतांश गरज भागविण्याची क्षमता या प्रकल्पांत असेल,' असे उत्तर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. 

या चारही स्थानकांवर सौरउर्जेची उपकरणे बसविण्याचे कंत्राट 'विवान सोलर' या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही चारही स्थानके वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्याच्या नियोजनानुसार, त्या स्थानकांच्या वीजेची पूर्ण गरज यातून भागणार नसली, तरीही या स्थानकांचे 'कार्बन फूटप्रिंट' कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.'' 

Web Title: Northern Railways to install Solar Energy instruments in four stations in New Delhi