esakal | काँग्रेसशी मैत्री म्हणजे मित्र पक्षांना नुकसान; बिहारच नव्हे, इतर राज्यांतही बसला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

congress

एकेकाळी अनेक राज्यात प्रमुख सत्ताधारी म्हणून मिरवलेला हा पक्ष सध्या ओहोटीला लागला आहे. आपल्याच साथीदारांच्या पाठीवरचं लोढणं बणून राहिल्याचं हे चित्र आहे. 

काँग्रेसशी मैत्री म्हणजे मित्र पक्षांना नुकसान; बिहारच नव्हे, इतर राज्यांतही बसला फटका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण अनेक प्रकारे केलं जातंय. मतमोजणीपूर्व कलांमध्ये राजद-काँग्रेसच्या महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल, असं वर्तवलं गेलं असतानाही ते सत्तेपासून वंचित राहिले याचं कारण काँग्रेसची खराब कामगिरी सांगितलं जात आहे. काँग्रेसशी युती केल्यामुळे राजदला सत्तेपासून लांब रहावं लागलं असं म्हटलं जातंय. गेल्या काही वर्षांपासून अनेक राज्यात काँग्रेसची अशीच खराब कामगिरी राहिली आहे. एकेकाळी अनेक राज्यात प्रमुख सत्ताधारी म्हणून मिरवलेला हा पक्ष सध्या ओहोटीला लागला आहे. आपल्याच साथीदारांच्या पाठीवरचं लोढणं बणून राहिल्याची ही भावना आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा अत्यंत खराब राहिला आहे. काँग्रेसने 70 जागी आपले उमेदवार उभे केले होते मात्र त्यापैकी फक्त 19 जागांवरच त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यांच्या या खराब कामगिरीमुळे राष्ट्रीय जनता दलासोबत मिळून केलेल्या महागठबंधनला पिछाडीवर जावं लागल्याचं चित्र दिसून येतंय. 

हेही वाचा - Bihar Election : ही माझी शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या नितीश कुमार यांचा यु-टर्न
राष्ट्रीय जनता दलाने 144 जागांपैकी 75 जागांवर विजय मिळवला आहे. त्यांचा स्ट्राईक रेट हा 52 टक्के इतका राहिला आहे. तर इतर तीन डाव्या पक्षांनी 29 जागा लढवल्या ज्यापैकी त्यांनी 16 जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या स्ट्राईक रेट हा 55 टक्के राहिला आहे. मात्र, या निवडणुकीत 75 जागांसह मोठा पक्ष ठरुनही आणि राजदने काट्याची टक्कर देऊनही एनडीएलाच 125 जागांवर बहुमत मिळून सत्ता मिळाली आहे. 
हे फक्त बिहारबाबतीतच घडलंय असं नाहीये. तर काँग्रेसचे महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातदेखील आपल्या सोबतच्या पक्षांसोबतचे मूल्य कमी झाले आहे. गेल्या काही वर्षांत हेच चित्र दिसून आलं आहे. उदा. महाराष्ट्रामध्ये 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत निवडणूक लढवली होती. तेंव्हा त्यांचा स्ट्राईकरेट हा 48 टक्के होता. तर 2014 मध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीशी फारकत घेत एकट्याच्या जोरावर ही निवडणूक लढवली तेंव्हा त्यांच्या स्ट्राईक रेट हा 14 टक्क्यांवर घसरला. 

हेही वाचा - Bihar Election : 'फोडाफोडीला भीक घालणार नाही; आम्ही NDA सोबतच!'
2019 मध्ये, काँग्रेसने परत राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवली. तेंव्हा त्यांच्या स्ट्राईक रेट 30 टक्क्यांवर आला. काँग्रेसने 147 जागांपैकी 44 जागांवर आपला विजय प्राप्त केला. 
हा 30 टक्के स्ट्राईक रेटदेखील शरद पवार यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे शक्य झाला होता. राहुल गांधी यांनी या निवडणुकीत फक्त दोन सभा घेतल्या होत्या. राज्यातील प्रमुख मानले जाणारे नेते हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापुरतेच सिमीत राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा 2019 मध्ये 45 टक्के राहिला होता. पक्षाने 121 जागी निवडणूक लढवून 54 जागा जिंकल्या. काँग्रेसने 2017 मध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत निवडणूक लढवली. राज्यात 1989 मध्ये एन. डी. तिवारी हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 2017 मध्ये 403 जागांपैकी काँग्रेसने 114 लढवल्या. त्यातील फक्त 7 जागा जिंकल्या. तर समाजवादी पार्टीने  311 जागापैकी 47 जागा जिंकल्या. ही निवडणूक भाजपने 312 जागांसह विक्रमी मतांनी जिंकली.

 
अगदी याचप्रमाणे, तमिळनाडूमध्येही पहायला मिळालं. काँग्रेसने द्रमुक पक्षासोबत घरोबा केला आहे. काँग्रेसचे 1963 ते 1967 या काळात शेवटचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 2016 साली तमिळनाडूमध्ये काँग्रेसने 41 जागा लढवल्या. यापैकी फक्त 8 जागा जिंकल्या. त्यांच्या स्ट्राईक रेट हा 19.5 राहिला होता. तर द्रमुकने 180 जागांपैकी 88 जागा जिंकल्या. मात्र ही निवडणूक अण्णा द्रमुकने 136 जागांसह जिंकली. ओडीसा, आंध्र प्रदेश , झारखंड अशा सर्वच राज्यात काँग्रेस एकेकाळी प्रमुख सत्ताधारी पक्ष होता. मात्र, या साऱ्या राज्यांतील त्यांचे अस्तित्व घटून ते कुणाच्या तरी पाठीवरचं ओझं बनून राहिल्याचं दिसून येतंय. 

loading image
go to top