आता कारागृहातूनही बिर्याणी मिळणार ऑनलाईन!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

कैद्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ विकण्यासाठी 'फ्रिडम फूड' हा कारखाना 2011 पासून सुरू झाला आहे. सुरवातीच्या काळात त्यांच्यामार्फत फक्त पोळ्या (रोटी) विकल्या जात होत्या.

तिरुअनंतपुरम : केरळमधील वियूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी बनवीत असलेल्या चवदार बिर्याणीची ख्याती वाढत असल्याने ही बिर्याणी आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या तुरुंग प्रशासनाने केला आहे. ही बिर्याणी 'कॉम्बो' स्वरूपात मिळणार असून, ती अवघ्या 127 रुपयांत मिळेल. 

वियूरच्या कारागृहातील कैदी तयार करीत असलेल्या बिर्याणीची ख्याती केवळ केरळमध्येच नाही, तर अन्यत्रही पोचली आहे. ही बिर्याणी अन्य लोकांनाही खाता यावी म्हणून तुरुंगाधिकाऱ्यांनी ऑनलाइन खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका कंपनीबरोबर करार केला आहे. कैद्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ विकण्यासाठी 'फ्रिडम फूड' हा कारखाना 2011 पासून सुरू झाला आहे. सुरवातीच्या काळात त्यांच्यामार्फत फक्त पोळ्या (रोटी) विकल्या जात होत्या.

वियूर कारागृहातील कैद्यांनी बनविलेले शाकाहारी पदार्थ, तसेच बेकरी उत्पादने आधीपासूनच विकली जात आहेत. आता त्यात बिर्याणीची भर पडेल, असे वियूर कारागृहाचे अधीक्षक निर्मलानंद नायर यांनी सांगितले. ऑनलाइन बिर्याणी विकण्याचा प्रस्ताव तुरुंग विभागाचे महासंचालक ऋषिराज सिंह यांच्याकडे देण्यात आला होता, असे ते म्हणाले. 

अशी असेल 'कॉम्बो बिर्याणी' 
कारागृहातून मिळणाऱ्या 'कॉम्बो बिर्याणी'मध्ये तीन चिकन पीससह बिर्याणी, तीन रोट्या, एक कप केक, लोणचे, सॅलड आणि पाण्याच्या एक लिटरच्या बाटलीचा समावेश असेल. बिर्याणी खाण्यासाठी सोबत केळ्याचे पानही दिले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Biryani gets online from prison in Thiruvananthapuram