'चौकीदारा'ला दोष देण्याची स्पर्धा : मोदी 

'चौकीदारा'ला दोष देण्याची स्पर्धा : मोदी 

नोएडा : बालकोटमधील हवाई कारवाईचे पुरावे मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. वादग्रस्त विधाने करून विरोधक पाकिस्तानात टाळ्या मिळवत आहेत, अशी टीका आज पंतप्रधानांनी केली. देशाच्या चौकीदाराला दोष देण्याची स्पर्धा लागली असून, माझ्यावर टीका केल्यास त्यांना मत मिळेल, असे विरोधक विचार करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

नोएडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन झाले. या वेळी उपस्थितांना बोलताना मोदींनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. विरोधक आज एवढे हताश झाले आहेत, की मोदींना विरोध करता करता देशाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले. या वेळी मोदींनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या पद्धतीवर टीका केली.

ते म्हणाले, की आज देश नवीन धोरण आणि नव्या पद्धतीनुसार काम करत आहे. उरी येथे 2016 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाने पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राइक केले आणि त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिले. उरीनंतर पुरावे मागितले गेले. अगोदर जे काही घडले नव्हते, ते आपल्या जवानांनी करून दाखविले. आपल्या जवानांनी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारले. दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांना अशा प्रकारच्या कारवाईची अपेक्षा नव्हती. पुलवामा हल्ल्यानंतर भारत याही वेळेस सर्जिकल स्ट्राइक करेल, या भीतीने त्यांनी सीमेवर सैनिकांची गस्त वाढविली, मात्र आपण या वेळी हवाई मार्गाने हल्ले केले. 24 फेब्रुवारी रोजी हवाई हल्ल्यानंतर भारत स्थितीवर शांततेच्या मार्गाने लक्ष ठेवून होते. मात्र पाकिस्तानने पहाटे पाचच्या वाजता मोदींनी हल्ले केल्याची आवई उठविली. काश्‍मीरमध्ये किती हल्ले केले तरी भारत काही करणार नाही, अशा विचारात ते होते.

कारण 2014 पूर्वी रिमोट कंट्रोलवर चालणारी सरकार होते. त्यामुळे दहशतवादी गाफील राहिले. बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले. काही नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात टाळ्या मिळवत आहेत. आज प्रत्येक भ्रष्ट व्यक्तीला मोदींपासून त्रास होत आहे. त्यात या चौकीदाराला दोष देण्याची स्पर्धा लागली आहे. माझ्यावर टीका केल्यास त्यांना मत मिळेल, असा ते विचार करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com