सीआरपीएफ जवानाने मांडल्या व्यथा अन् प्रश्न

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

सीआरपीएफच्या जवानांना भारतीय सैन्यापेक्षा कमी सुविधा मिळतात. देशातील निवडणुका, नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, मंदिर, मशीद यासारख्या धार्मिक स्थळांची सुरक्षा सीआरपीएफचे जवान करतात. परंतू त्याप्रमाणात सुविधा त्यांना मिळत नाहीत.

नवी दिल्ली - देशातील सरकारी शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना आमच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. सगळे सण उत्सव ते कुटूंबासोबत साजरे करतात, परंतु आम्हाला कुटुंबापासुन दूर राहुनही सोयी सुविधांसाठी झगडावे लागत आहे, अशी व्यथा मांडणारा केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) व्हिडिओ आता समोर आला आहे. बीएसएफ जवानाने दररोज मिळत असलेल्या अन्नाचा पंचनामा केल्यानंतर आणखी एक जवानाने व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधानांकडे मदतीची मागणी केली आहे.

सीआरपीएफच्या जवानांना भारतीय सैन्यापेक्षा कमी सुविधा मिळतात. देशातील निवडणुका, नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, मंदिर, मशीद यासारख्या धार्मिक स्थळांची सुरक्षा सीआरपीएफचे जवान करतात. परंतू त्याप्रमाणात सुविधा त्यांना मिळत नाहीत, असे काही ज्वलंत भेडसावणारे प्रश्न सीआरपीएफचे जवान जित सिंह यांनी व्हिडिओतून मांडले आहेत.

भारतीय लष्करातील जवानांना मिळणाऱ्या पेन्शन सुविधा, आरोग्य सुविधा, कॅन्टीनची सुविधा सीआरपीएफच्या जवानांना मिळत नाहीत. माजी सैनिकाचा दर्जाही आम्हाला मिळत नाही. सीआरपीएफमधून निवृत्त झाल्यानंतर काय होईल हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्यामुळे पंतप्रधानांना विनंती आहे, की त्यांनी आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
 
दोन दिवसांपुर्वीच सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने (बीएसएफ) जम्मू-काश्मीरमधील सीमेवर शुट केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये तेज बहादूर या जवानाने आम्ही सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेले सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकतात त्यामुळे निकृष्ट जेवण मिळते अनेकवेळा तर उपाशी झोपावे लागते असे सांगितले होते.

Web Title: Now CRPF jawan cries discrimination in a video