अन्नाची नासाडी थांबवण्याचे केंद्राचे प्रयत्न

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

ज्या देशात लाखो लोक उपाशी राहतात, त्या देशात अन्नाची नासधूस करणे हे पाप आहे. ही अन्नाची नासधूस थांबावी, म्हणून हॉटेल व्यावसायिकांसोबत एक बैठक घेतली जाणार आहे. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अन्नाचे प्रमाण किती असावे, हे ठरवले जाईल.
- रामविलास पासवान, केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि वितरणमंत्री

नवी दिल्ली - सभा, समारंभ, महागडी हॉटेल, मोठेमोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासधूस ही भारतीयांसाठी नित्याची बाब असते. काहींना तर अन्न वाया जाणे म्हणजे मोठेपणा अथवा आर्थिक सुबत्तेचे लक्षण वाटते; मात्र आता केंद्र सरकार अन्नाची नासाडी थांबवणारा कायदा अस्तित्वात आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे देशातील अन्नाची नासधूस थांबून तेच अन्न गरिबांच्या मुखात जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासधूस कमी व्हावी या दृष्टीने केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीला दिली. हॉटेलमध्ये जेवण मागवण्यापूर्वी ते जेवण किती येते याची ग्राहकाला कल्पना असायला हवी. त्यानुसार ते मागणी करू शकतात. त्यामुळे ग्राहकाचे पैसे वाया जाणार नाही तसेच अन्नही वाया जाणार नाही, असे पासवान म्हणाले.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी अत्यावश्‍यक पावले उचललली जाणार आहेत. नासाडीबाबतचा नियम केवळ ग्राहकांच्या हितासाठी असून, प्रत्येक हॉटेलमध्ये हाफ किंवा क्वार्टर प्लेट मागवता येईल याबद्दलही विचार सुरू आहे.

याआधी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या "मन की बात' या कार्यक्रमामधून सातत्याने वाया जाणाऱ्या अन्नाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानुसारच पासवान पावले उचलत आहेत, असे म्हटले जात आहे. हे नियंत्रण केवळ मोठ्या हॉटेलमध्येच असणार आहे. ज्या ठिकाणी मर्यादित थाळी अथवा बुफे पद्धतीने जेवण दिले जाते, तिथे हे नियंत्रण नसेल.

ज्या देशात लाखो लोक उपाशी राहतात, त्या देशात अन्नाची नासधूस करणे हे पाप आहे. ही अन्नाची नासधूस थांबावी, म्हणून हॉटेल व्यावसायिकांसोबत एक बैठक घेतली जाणार आहे. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अन्नाचे प्रमाण किती असावे, हे ठरवले जाईल.
- रामविलास पासवान, केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि वितरणमंत्री

Web Title: Now Modi government wants to fix food portions served in restaurants