आता "लॉग इन' न करताच गाड्यांची माहिती कळणार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून रेल्वेची तिकिटे काढणाऱ्यांसाठी रेल्वेने "आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळामध्ये लक्षणीय बदल केले आहेत. यामुळे प्रवासाचे नियोजन, तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. 
 

नवी दिल्ली - घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून रेल्वेची तिकिटे काढणाऱ्यांसाठी रेल्वेने "आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळामध्ये लक्षणीय बदल केले आहेत. यामुळे प्रवासाचे नियोजन, तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. 

सद्यःस्थितीत रेल्वेच्या आरक्षित तिकिटांपैकी केवळ दोन तृतीयांश एवढी तिकिटे ऑनलाइन खरेदी केली जातात. 

"आयआरसीटीसी'च्या या ऑनलाइन पोर्टलच्या आधुनिक "बीटा व्हर्जन'चे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज उद्‌घाटन केले. नव्या "इंटरफेस'मुळे युजरला लॉग इन न करता रेल्वेगाड्या आणि आसन उपलब्धतेची माहिती घेता येईल. त्याचप्रमाणे वेबसाइट पाहणे सोईस्कर व्हावे यासाठी फॉन्टचा आकारही युजरला बदलता येणार आहे. सुधारित वेबसाइटवर 

श्रेणीनिहाय, गाडीनिहाय, आगमन आणि प्रस्थाननिहाय, त्याचप्रमाणे कोटानिहाय वर्गीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वेगाडी क्रमांक, रेल्वेगाडीचे नाव, प्रस्थान आणि गंतव्य स्थानकांमधील अंतर, आगमन- प्रस्थानाचे वेळापत्रक, प्रवासाला लागणारा वेळ, अशी सर्व माहिती एकाचवेळी मिळू शकेल.

माहितीला नवे फिल्टर 
"माय ट्रॅन्जॅक्‍शन' हे नवे फिल्टरदेखील पोर्टलवर असेल. त्याच्या मदतीने युजरला प्रवासाच्या तारखेला बुकिंग झालेली तिकिटे, बुकिंगची तारीख, पुढील प्रवास आणि पूर्ण झालेल्या प्रवासाची माहितीदेखील मिळवता येईल. प्रतीक्षा यादीची माहिती, तसेच आरएसी तिकीट कन्फर्म होण्याची शक्‍यता किती आहे हेदेखील प्रवाशांना यातून कळू शकेल. यासोबतच आगामी 120 दिवसांतील आसन उपलब्धतेची माहितीदेखील या पोर्टलच्या माध्यमातून प्रवाशांना मिळेल आणि "विकल्प'च्या माध्यमातून पर्यायी रेल्वेगाडी निवडणे, प्रस्थान स्थान बदलणे या पर्यायांचाही वापर करता येईल.

Web Title: Now we will know the information of the trains without 'logging in'