आणखी एक दहशतवादी हल्ला; दोवालजी, भारत बलुचिस्तान 'स्वतंत्र' करणार का?

वृत्तसंस्था
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यापूर्वीच काही महिने.. म्हणजेच फेब्रुवारी 2014 मध्ये दोवाल यांनी एका कार्यक्रमात केलेले भाषण 'यूट्युब'वर प्रसिद्ध आहे. त्या भाषणामध्ये दोवाल यांनी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची प्रतिमा 'भारताचे जेम्स बॉंड' अशी आहे.. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आता दोवाल काय पावले उचलणार, याकडे भारतातील जनतेसह पाकिस्तानचेही लक्ष आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, सोशल मीडियामध्ये सध्या पुन्हा एकदा व्हायरल होत असलेला दोवाल यांचा व्हिडिओ! पाच वर्षांपूर्वी दोवाल यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता.. आता 'त्या' इशाऱ्याचे काय होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यापूर्वीच काही महिने.. म्हणजेच फेब्रुवारी 2014 मध्ये दोवाल यांनी एका कार्यक्रमात केलेले भाषण 'यूट्युब'वर प्रसिद्ध आहे. त्या भाषणामध्ये दोवाल यांनी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. 

'संरक्षणाचे तीन पैलू असतात. बचावात्मक धोरण, बचाबात्मक आक्रमकता आणि पूर्ण आक्रमक धोरण! पूर्ण आक्रमक धोरण स्वीकारण्यामध्ये अणुयुद्धाचा धोका असतो, त्यामुळे तो पर्याय बाजूला पडतो. सध्या आपण फक्त बचावात्मक धोरण स्वीकारले आहे. पण बचावात्मक आक्रमकतेमध्ये आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींवर कारवाई करणे महत्त्वाचे असते. मग या धोरणामध्ये पाकिस्तानला आर्थिक, राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडणे वगैरे उपायांचा समावेश होऊ शकतो. पाकिस्तानला त्यांच्याच देशात गुंतवून ठेवणे, हाही त्यातीलच एक भाग आहे', असे दोवाल त्या भाषणामध्ये म्हणाले होते. 

यापुढील भाग महत्त्वाचा आहे. 'देशातील संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडण्याची शक्‍यता पाकिस्तानमध्ये खूप जास्त आहे. भारताच्या तुलनेत हे प्रमाण पाकिस्तानमध्येच अधिक आहे. बचावात्मक धोरणातून भारत 'बचावात्मक आक्रमकते'कडे वळला आहे, हे पाकिस्तानला समजेल त्यावेळी त्यांना हेही कळून चुकेल, की यापुढे पुन्हा मुंबईसारखा हल्ला झाला, तर त्यांना बलुचिस्तानला गमवावे लागेल', असा सूचक इशारा दोवाल यांनी दिला होता. 

परवा पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला भीषण होता. त्यामध्ये 44 जवान हुतात्मा झाले. आता केंद्र सरकार आणि अजित दोवाल काय रणनिती आखतात, याकडे सर्वसामान्यांचेही लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSA Ajit Doval talked about terrorist attackts and Balochistan