esakal | देशात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येने गाठला विक्रमी टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

देशात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येने गाठला विक्रमी टप्पा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील कोरोना महामारीच्या उद्रेकाची स्थिती गंभीर असल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. त्याचबरोबर केंद्राने पुरेसे व्हेंटीलेटर पुरविले तरी अनेक राज्यांकडे ते बसविण्याची व्यवस्था नसल्याचाही आरोप केंद्राने केला आहे. देशात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येने विक्रमी टप्पा गाठला असून सव्वादोन लाखांवर नवे रुग्ण आढळले तर, बळींची संख्याही आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १३०० च्या आसपास झाली आहे. मागील वर्षी देशाला महामारीचा पहिला तडाखा बसल्यापासूनची ही सर्वाधिक रूग्णसंख्या आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) कोरोना रुग्णांवरील उपचारांच्या व वैद्यकीय सुविधांच्या स्थितीची पाहणी केली. ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया हेही त्यावेळी उपस्थित होते. पाहणीनंतर त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाच्या संसर्गाने वेग पकडला हे खरे असले तरी सरकार संपूर्ण शक्तिनिशी लढा देत आहे. सरकारी यंत्रणेचा आत्मविश्‍वास पहिल्या लाटेच्या अनुभवातून वाढला आहे. डॉक्‍टरांनी या कठीण काळात आपले धाडस व संयम कायम ठेवावा असेही त्यांनी आवाहन केले.

हेही वाचा: ''खरंच काळजी असेल तर''; पुनावालांची बायडेन यांना हात जोडून विनंती

डॉ. हर्षवर्धन पुढील काही दिवस राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी व मुख्य सचिवांशी सासत्याने संपर्कात राहणार आहेत. त्याचबरोबर ते देशातील विविध आरोग्य सेवांच्या मुख्यालयांत जाऊनही पाहणी करतील. हर्षवर्धन म्हणाले की, २०२० च्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आपल्या देशातील डॉक्‍टरांकडे आता पूर्वीपेक्षा १०० टक्के जास्त अनुभवही आहे.

केंद्र सरकारकडे पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचा दावा करून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ‘‘देशातील कोणत्याही रुग्णालयात व्हेंटीलेटरची कमकरता पडू दिली जाणार नाही. सध्याच्या स्थितीत कोणत्याही राज्याने व्हेंटीलेटरसाठी नव्याने मागणी नोंदविलेली नाही. ज्यांनी मागणी केली त्या बहुतांश राज्यांची मागणी केंद्राने पूर्ण केलेली आहे. अनेक राज्यांकडे केंद्राकडून आलेल्या व्हेंटीलेटरचा उपयोग करण्याची जागा व इतर वैद्यकीय व्यवस्था पुरेशी नाही असेही दिसून आले आहे.’’

हेही वाचा: कुंभमेळ्यातील आणखी एका आखाडा प्रमुखाला कोरोनाची बाधा; याआधी एकाचा मृत्यू

स्वतंत्र वॉर्ड तयार करा

डॉ. हर्षवर्धन यांनी सूचना केली की, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील व सार्वजनिक उद्योगांच्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी वेगळी रुग्णालये किंवा स्वतंत्र वॉर्ड तयार करावेत. या नव्या कोविड रुग्णालयांचा प्रवेश मार्ग वेगळा असावा व रुग्णांची विशेष काळजी घेण्याची सुविधाही तेथे असावी.

सर्वाधिक रुग्णवाढ

महाराष्ट्र - ६३ हजार ७२९

उत्तर प्रदेश - २७ हजार ३६०

दिल्ली - १९ हजार ४८६

छत्तीसगड - १५ हजार २५६

जावडेकर यांना कोरोना संसर्ग

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनीच ट्वीटरवरून ही माहिती जाहीर केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेदेखील कोरोनाबाधित झाले आहेत. काँग्रेसच्याही दोन नेत्यांना संसर्ग झाला आहे. अकाली दलाचे नेत्या हरसिमरत कौर बादल यादेखील बाधित झाल्या आहेत.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्वीट करत, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. तसेच, गेल्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना आठ महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एका खासगी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. ‘माझी कोरोना चाचणी झाली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे,’ असे त्यांनी नंतर ट्विट केले. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेत विलगीकरणात जावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याआधीही गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये येडीयुरप्पा यांना संसर्ग झाला होता. या दोन नेत्यांबरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनाही संसर्ग झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील दोन दिवसांपूर्वी बाधित ठरले आहेत.

loading image
go to top