ममता यांच्या "मॉं'वर आक्षेप

श्‍यामल रॉय
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

चित्रपट महोत्सवात लघुपट दाखविल्याने रसिकांमध्ये नाराजी

कोलकता- पश्‍चिम बंगालमध्ये 24 व्या कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनाला अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांच्या उपस्थितीने "चार चॉंद' लागले असले तरी महोत्सवाच्या ठिकाणी झळकणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छायाचित्रांवरुन वादाला तोंड फुटले. आता ममता बॅनर्जी यांच्या कार्यावर आधारित लघुपटाची यात भर पडली आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर "मॉं' या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. बॅनर्जी यांनी "कन्याश्री' आणि "शिक्षश्री' योजनेतून मुलींच्या जीवनात कसा बदल घडविला, याचे चित्रण केले आहे. हा लघुपट या महोत्सवात दाखविल्यानंतर नवा वाद सुरू झाला. गेल्या वर्षी मल्लिका रॉयचौधरी यांनी तयार केलेला अशाच प्रकारचा "कन्याश्री सन्मान' नावाचा लघुपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक अनिक दत्ता यांच्यासह काही चित्रपट शौकिन व प्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला आहे. महोत्सवाच्या स्थळावर चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांची छायाचित्रे लावण्याऐवजी मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे लावणे योग्य आहे का?, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. दत्त म्हणाले की, चित्रपट महोत्सवात असे होणे खचितच चांगले नाही. मी याबाबत केलेल्या चौकशीत असे दिसून आले आहे, की जगात अन्य ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही चित्रपट महोत्सवात अशा गोष्टी होत नाहीत. 

मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांवरुन निर्माण झालेला वाद शमतो ना शमतो तोच "मॉं' या लघुपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिशीर मंची येथे 25 मिनिटांचा हा लघुपट दाखविण्यात आला. तेव्हा चित्रपट महत्सवात हा लघुपट दाखविल्याबद्दल रसिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. हावडा महानगरपालिकेतील तृणमूल कॉंग्रेसच्या नगरसेवकाने हा लघुपट बनविला आहे. महोत्सवासाठी लघुपट व माहितीपटाची निवड करणाऱ्या समितीने याबद्दल हात वर केले आहे. समितीच्या सदस्यांनी एका महिन्यात 600 किंवा त्यापेक्षा जास्त चित्रपट पाहिले आहेत. त्यातून कोणत्या चित्रपटाची निवड करायची, कोणत्या नाही, याबद्दल प्रत्येक सदस्यांनी स्वतंत्र मत नोंदिवले होते. याबाबतचा अंतिम निर्णय हा महोत्सवाच्या समितीचा होता. आम्ही आमच्या बाजूने उत्तम चित्रपटांचीच निवड केली होती, असे लघुटप व माहितीपट निवड समितीच्या अध्यक्षा सुप्रिया सेन यांनी स्पष्ट केले. 

"चांगले लघुपटच आले नाहीत' 
"मॉं' लघुपटावरील वाद हा किरकोळ आहे, अशी बाजू सावरण्याचा प्रयत्न महोत्सव समितीच्या अध्यक्षांनी केला. कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्तम चित्रपट दाखविले जावे, असा आयोजकांचा प्रयत्न असतो. पण चांगले लघुपट व माहितीपटाची कमतरता होती. यंदा लघुपटासाठी पाच लाखांचे व माहितीपटासाठी तीन लाखांचे भरघोस पारितोषिक जाहीर केले होते. तरी नवे व युवा चित्रपट निर्मात्यांनी याकडे पाठ फिरविली, असा खुलासा समितीने केला आहे.

Web Title: Objection on Mamta Short Film