Odisha Train Accident : डब्याचे पत्रे चिरून जखमींना बाहेर काढले Odisha Train Accident balasore sheets of bogie box cut and injured were taken out | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Odisha Train Accident

Odisha Train Accident : डब्याचे पत्रे चिरून जखमींना बाहेर काढले

बालासोर - तिहेरी रेल्वे अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती काही गाड्यांचे काही डबे दूरवर भिरकावल्या गेले होते. रेल्वे ट्रॅकवर रक्ताचा सडा पडला होता. मानवी अवयवांचे अवशेष इतरत्र विखुरल्या गेले होते. घटनास्थळी शुक्रवार रात्रीपासूनच मदत आणि बचाव कार्याला सुरूवात झाली होती. गॅस कटरच्या साहाय्याने डब्यांचे पत्रे चिरून जखमी आणि मृतांना बाहेर काढले. वैद्यकीय पथकातील कर्मचारी, लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान रात्रीपासून मेहनत घेत होते.

रुग्णावाहिकांचे सायरन आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या शिट्यांच्या आवाजामुळे घटनास्थळीचे वातावरण आणखीनच गंभीर झाले होते. रेल्वे मार्गावर अपघातग्रस्त डब्यांचे अवशेष विखुरले होते. दोनशे रुग्णवाहिका, राज्य महामंडळाच्या शेकडो बस, शेजारील जिल्ह्यांतील शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांचे हात मदत आणि बचाव कार्यामध्ये जुंपले होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे दीड हजार कर्मचारीही मदत कार्यामध्ये सहभागी झाले होते. रेल्वेच्या परस्परांवर आदळलेल्या डब्यांना बाजूला करण्यासाठी क्रेन व बुलडोजरची मदत घेण्यात आली. डबे हे मोठे असल्याने त्यांना हलविण्यासाठी कोलकत्यावरून विशेष क्रेन मागवली आहे.

स्थानिक मदतीला धावले

स्थानिकांना या अपघातानंतर मोठा आवाज ऐकू आला त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. समोर फक्त स्टीलचे ढिगारे आम्हाला दिसत होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दीपक बेरा यांनी सांगितले की, ‘‘आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेतली, जखमींना डब्यांतून बाहेर काढत त्यांना पाणी दिले.’’

रुग्णालयाची झाली लष्करी छावणी

बालासोरमधील जिल्हा रुग्णालयाला अक्षरशः लष्कराच्या छावणीचे रूप आले होते. काही जखमींवर रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये स्ट्रेचरवरच उपचार करण्यात आले तर काहींच्या उपचारासाठी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची सोय करण्यात आली होती. यावेळी अन्य राज्यांतील डॉक्टरही उपचारात सहभागी झाले. त्यांना परस्परांशी संवाद साधताना भाषेचा अडथळा येत होता.

रक्तदानासाठी लोकांची गर्दी

जखमींवरील उपचारासाठी पुरेसे रक्त मिळावे म्हणून पोलिस कर्मचारी आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. बालासोर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये जखमींना रक्त देण्यासाठी तब्बल दोन हजार लोक जमा झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही त्यासाठी स्थानिक अधिकारी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींच्या नातेवाइकांनी त्यांच्या निकटवर्तीयांची भेट घेण्यासाठी बालासोरच्या दिशेने कूच केली आहे.

रेल्वेतून प्रवास करत असताना आम्हाला मोठा धक्का बसला, त्यानंतर काही क्षणांत आम्ही बाहेर फेकल्या गेलो. बाहेर पाहतो तर गाड्यांचे डबे रेल्वे मार्गावर विखुरलेले दिसून आले. आम्ही काही डब्यांच्या खालून बाहेर पडलो, तेव्हा रूळावर रक्ताचा सडा पडलेला होता. मृतदेह देखील सर्वत्र विखुरलेले दिसून आले. या अपघातामध्ये माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे पण मी उपचारासाठी रुग्णालयामध्ये जाणार नाही. मला आता घरी जायचे आहे.

- पिजूष पोद्दार, प. बंगालच्या बेरहामपूरचे रहिवासी

मी माझ्या मुलीची वाट पाहतो आहे, आमचे दूरध्वनीवरून फक्त काही सेकंदांसाठी बोलणे झाले. ती दुसऱ्याच्या फोनवरून कशी बोलली हे मला ठावूक नाही.

- भवानीशंकर शर्मा, पीडित कुटुंब

टॅग्स :Odishaaccidentrailway