
Odisha Train Accident : स्थानिकांनी दाखवलं माणुसकीचं दर्शन, रात्रभर रक्तदानासाठी रुग्णालयात गर्दी; फोटो व्हायरल
ओडिसामध्ये शुक्रवारी भयानक रेल्वे अपघात झाला. तीन रेल्वेंच्या या अपघातामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सरकारने मृतांचे नातेवाईक आणि जखमी प्रवाशांसाठी मदत जाहीर केली आहे. मात्र, या सगळ्यात स्थानिकांनी वेळीच जखमींना वाचवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न पाहून माणूसकी अजूनही जिवंत असल्याचं दिसून आलं.
सोशल मीडियावर या अपघाताचे कित्येक फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, यासोबतच जखमींच्या मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांचे फोटोही समोर आले आहेत. एका फोटोमध्ये रक्तदान करण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांची रुग्णालयातील गर्दी दिसून येत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो बालासोरजवळील एका रुग्णालयातला आहे. याठिकाणी रक्तदानासाठी स्वतःहून पुढे आलेल्या लोकांची रांग दिसून येत आहे. अनोळखी लोकांच्या मदतीसाठी अगदी मध्यरात्री लोक बाहेर पडले होते. हा फोटो पाहून नेटिझन्स देखील या लोकांचे कौतुक करत आहेत.
बचावकार्य सुरू
दरम्यान, रेल्वे अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी सुमारे २०० रुग्णवाहिका आणि ४५ मोबाईल हेल्थ टीम दाखल झाल्या आहेत. यासोबतच सुमारे ७५ डॉक्टरांचे एक पथक देखील याठिकाणी दाखल होत आहे, अशा माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, बालासोरजवळ झालेल्या या अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, ओडिसा सरकारने शनिवारी दुखवटा जाहीर केला आहे.