ओमिक्रॉनचं संकट; आढावा बैठकीत मोदींनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

कोरोनाचा अवतार ओमिक्रॉनचा उद्रेक देशभरात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला.
Narendra Modi
Narendra ModiSakal

नवी दिल्ली : कोरोनाचा अवतार ओमिक्रॉनचा उद्रेक देशभरात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक तयारीचा तपशील जाणून घेतला. जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा पोहोचविण्यावर भर द्यावा, बालकांच्या लसीकरण वेगाने केले जावे अशा सूचना दिल्या. आरोग्यमंत्री मंडाविया सोमवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. (Omicron Variant PM Narendra Modi's New Rule)

गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मंडाविया, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल, मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा, गृह सचिव ए. के. भल्ला, आरोग्य सचिव राजेश भूषण, सचिव डॉ. राजेश गोखले (जैवतंत्रज्ञान), आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव आदी उपस्थित होते. या बैठकीत आरोग्य सेवांबाबतचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी चाचणी साहित्य, ऑक्सिजन आणि आयसीयू खाटांची उपलब्धता, जीवनरक्षक औषधांची उपलब्धता याबाबतची माहिती पंतप्रधानांनी या बैठकीत जाणून घेतली. तर, १५ ते १८ वयोगटातील बालकांच्या लसीकरण मोहिमेंतर्गत ३१ टक्के बालकांना पहिला डोस दिल्याचे सांगण्यात आले.

Narendra Modi
पुण्यात बाधितांपैकी फक्त ५.४८ टक्केच लोकं रुग्णालयात दाखल

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि उपाययोजनांबाबत याआधी २४ डिसेंबरला पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर नागरिकांना दक्ष राहण्याचे आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड नियमावलीचे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नव्या प्रकार तुलनेने सौम्य असल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत असला तरी भारतात फैलाव झाल्यानंतर त्यामध्ये बदल होण्याची आणि हे बदल त्रासदायक ठरण्याची चिंताही भेडसावते आहे.

‘टेलिमेडिसीन’चा वापर करावा

त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, कोरोना विषाणूमध्ये वेगाने बदल होत असल्याने ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ सोबतच चाचण्या, लसनिर्मितीमध्ये देखील सातत्यपूर्ण संशोधनाकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली. कोविड स्थितीवर लक्ष देताना अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि दुर्गम भागातील रुग्णांच्या उपचारासाठी टेलिमेडिसीन पद्धतीचा वापर करावा असे सांगितले. लवकरच या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक बोलावण्याचेही संकेत दिले.

डॉक्टरही विळख्यात

दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रचंड वेगाने फैलाव होत आहे. तर पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळेच या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाने प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत बंदीही घातली आहे.

आतापर्यंत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८० हजारांवरून वाढून थेट सहा लाखापर्यंत पोहोचल्याने सरकारची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एम्स, राम मनोहर लोहिया रुग्णालयासह बऱ्याच रुग्णालयांमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश आणि अन्य न्यायालयीन कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

Narendra Modi
साडेआठ महिन्यानंतर पहिल्यांदा रुग्णांचा साडेसहा हजारांचा आकडा पार

दिल्लीमध्ये आधीच रात्रीची संचारबंदी आणि ‘वीकेंड कर्फ्यू’ लागू करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन आणि घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. तर, केंद्र सरकारनेही कार्यालयांमध्ये ५० टक्केच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांवर

दिल्ली प्रमाणेच महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये देखील कोरोनाला अटकाव करण्यासाठी कठोर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. मात्र संसर्गाचे प्रमाण वाढते आहे. शनिवारी कोरोनाचे १.६ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या दिवसभरात ४०८६३ रुग्ण बरे झाले असले तरी ३२७ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्त सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ९० हजार ६११ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com