ईदच्या दिवशीच हिंसाचार संघर्षात एकाचा मृत्यू 

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

रमजान ईदनिमित्त सर्वत्र शांततेचे आवाहन केले जात असताना जम्मू-काश्‍मीरमध्ये मात्र संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यातील संघर्षात एकाचा मृत्यू होण्याबरोबरच पाकिस्तानकडून आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार होण्याच्याही घटना घडल्या. 

श्रीनगर : रमजान ईदनिमित्त सर्वत्र शांततेचे आवाहन केले जात असताना जम्मू-काश्‍मीरमध्ये मात्र संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यातील संघर्षात एकाचा मृत्यू होण्याबरोबरच पाकिस्तानकडून आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार होण्याच्याही घटना घडल्या. 

रमजान ईदनिमित्त आज झालेल्या नमाजानंतर श्रीनगर, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षा वेळी हातबॉंबचा स्फोट होऊन एका आंदोलकाचा मृत्यू झाला. नमाज झाल्यानंतर अनेक गावांमध्ये शेकडो युवकांनी रस्त्यावर येत घोषणाबाजी सुरू केली. श्रीनगरमध्ये मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकांना सुरक्षा दलांनी सुरक्षेच्या कारणास्तव रोखून धरले आणि निघून जाण्यास सांगितले. मात्र, आंदोलकांनी निघून जाण्याऐवजी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे सुरक्षा दलांना नाइलाजास्तव लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा करावा लागला. अनंतनाग आणि पुलवामामध्येही, हीच परिस्थिती होती. अनंतनागमधील एका गावात संघर्ष सुरू असतानाच हातबॉंबचा स्फोट होऊन शेराझ अहमद याचा मृत्यू झाला. तिन्ही जिल्ह्यांमध्ये अद्याप काही प्रमाणात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत काही आंदोलक आणि सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. 

जवान हुतात्मा 
जम्मू : पाकिस्तानने आज शस्त्रसंधीचा भंग करत राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात गस्ती पथकावर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. नियंत्रण रेषेवर झालेल्या या चकमकीत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. विकास गुरुंग (वय 21) असे या सर्वोच्च बलिदान दिलेल्या जवानाचे नाव असून, तो मूळ मणिपूरचा होता. दरम्यान, श्रीनगर शहराच्या बाहेरील भागात दहशतवाद्यांनीही केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केल्याने एक जवान जखमी झाला. 

Web Title: One dies of violence in the day of Eid