भूमिपूजन सोहळ्यापूर्वी राम मंदिरातील आणखी एका पुजाऱ्याला कोरोना

सुशांत जाधव
Tuesday, 4 August 2020

कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.

अयोध्या: राम मंदिर भूमिपूजनापूर्वी मंदिरातील आणखी एक पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त आहे. सोमवारी रामलल्लाचे सहाय्यक पुजारी प्रेम कुमार तिवारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच शुक्रवारी पुजारी प्रदीप दास आणि राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 14 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती.  बुधवारी अयोध्येतील रामजन्मभूमिच्या स्थळावर उभारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य काही मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. भूमिपूजनाच्या मुहूर्तापूर्वी आणखी एका पुजाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  

अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर

कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नित्या गोपालदास या पाच व्यक्तींनाचा व्यासपीठावर असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. राम मंदिर भूमीपूजनासाठी जवळपास 150 जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. देशात कोरोना महामारीने थैमान घातले असताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 40 किलो चांदीची विट रचून भूमिपूजनासह भव्य दिव्य राम मंदिराच्या बांधणीला सुरुवात होणार आहे. 

मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण

भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त असून बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. राम मंदिर आंदोलनातील आघाडीचे चेहरे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उभा भारती हे भाजप नेते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  भूमी पूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार नाहीत. अडवाणी यांच्यासह मुरली मनोहर जोशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थिती लावतील, असेही वृत्त आले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more priest tests positive of covid 19 befor ram mandir bhumi pujan Ceremony in ayodhya