कांदा उत्पादकांच्या मदतीला प्रभू धावले 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मालगाड्यांची संख्या दररोज चारवर; वाहतुकीचा मार्ग मोकळा 

नवी दिल्ली - नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे प्राण कंठाशी आणणाऱ्या कांद्याची रेल्वेद्वारे मालवाहतूक करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शीघ्र मदतीचा हात दिला असून, आजपासून कांद्याची वाहतूक करणाऱ्या प्रत्येकी 42 डब्यांच्या मालगाड्यांची संख्या दरदिवशी दोनवरून चारपर्यंत वाढवली आहे. यामुळे या भागांतील बाजारपेठांत पडून असलेला किमान दहा हजार टनांपर्यंतचा कांदा नाशिक, येवल्यासह नऊ स्थानकांवरून दररोज उचलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आगामी आठवड्यात 58 डब्यांची; म्हणजे सुमारे 3700 टन कांदा वाहून नेण्याची क्षमता असलेली गाडी सोडण्याचेही रेल्वे मंत्रालयाने निश्‍चित केले आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी आज दिल्लीत दिली. 

सध्या ज्या चार मालगाड्या सोडल्या जात आहेत, त्यातही व्यापाऱ्यांची मागणी असेल, तर अतिरिक्त वाघिणी तातडीने लावाव्यात, अशाही सूचना प्रभू यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड, निफाड, खेरवाडी व नाशिकसह नऊ मुख्य स्थानकांवरून दररोज कांदा उचलला जावा, यासाठी मालगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रभू यांनी घेतला. सध्याच्या तीनऐवजी चार मालगाड्या सोडण्याचाही निर्णय त्यांनी काल रात्री अंतिम केला. कांदा उत्पादकाच्या जीवनमरणाचा प्रश्‍न बनला असताना मुख्यमंत्र्यांचा झोप तरी कशी लागते, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच विचारला होता. कांद्याचा हा वांधा लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी प्रभू यांच्याशी गेले तीन-चार दिवस सातत्याने चर्चा केली व त्यातून मालगाड्यांची संख्या युद्धपातळीवर वाढविण्याचा निर्णय काल रात्री अमलात आणण्यात आला. 
यातील चौथी मालगाडी नाशिक जिल्ह्यात पोचल्याचीही माहिती रेल्वे मंत्रालयात सायंकाळी मिळाली. कांद्याच्या हंगामात या भागातून यापूर्वी एक किंवा दोन मालगाड्या सोडल्या जात असत. यंदा ही संख्या आधी तीनवर व आता चारवर व आगामी आठवड्यात पाचवर नेण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. यातील चार मालगाड्या मिळून रोज सुमारे दहा हजार टन कांदा उचला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीच्या तुलनेत ही वाढ शंभर टक्के असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मालगाड्या थांबवू नका 
कांदा हे नाशवंत पीक असल्याने ते बाजारपेठांमध्ये वेळीच पोचावे या दृष्टीने या मालगाड्या जास्त काळ थांबवून ठेवू नका, अशाही स्पष्ट सूचनाही प्रभू यांनी दिल्या आहेत. अलाहाबाद-मुघलसराय या लोहमार्गावर गाड्यांची संख्या भरमसाट वाढवून ठेवल्याने मालगाड्यांना प्राधान्य मिळत नाही. मात्र नाशिक जिल्ह्यातून कांदा घेऊन येणाऱ्या मालगाड्यांबाबत पुढचे काही दिवस तसा विलंब करणे टाळावे, अशाही सूचना रेल्वे मंत्रायातून उत्तर-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
 
Web Title: onion market suresh prabhu