
या घटनेवरुन बिहार सरकारमधील मंत्री संजय कुमार झा यांनी विरोधी पक्षावर हल्ला केला आहे.
पाटना : बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. यादरम्यानच बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार करत आहेत. ते आज मधुबनी जिल्ह्यातील हरखालीमध्ये प्रचारसभा करत होते. नितीश कुमार या प्रचारसभेत नोकऱ्यांबाबत बोलत होते त्यादरम्यानच समोरील गर्दीमधून कुणीतरी त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. नंतर माहीती मिळाली की ते दगड नसून कांदे होते. नितीश कुमार यांच्यावर कांदे फेकण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेवर नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी चालू भाषणातच कांदे फेकणाऱ्याला म्हटलं की फेका... फेका... अजून फेकत रहा...
हेही वाचा - काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना देशाने नाकारलं; बिहार-युपीत दयनीय अवस्था
या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा रक्षक सतर्क झाले आणि त्यांनी त्यांच्याभोवती सुरक्षा वाढवली. नितीश कुमारांनी आपलं भाषण पूर्ण केलं. जेंव्हा कांदे फेकणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा रक्षक पकडायला गेले तेंव्हा नितीश यांनी त्यांना मध्येच अडवलं. त्यांनी म्हटलं की, या लोकांना सोडून द्या, काही दिवसांनंतर त्यांना जाणीव होईल. तर या घटनेवरुन बिहार सरकारमधील मंत्री संजय कुमार झा यांनी विरोधी पक्षावर हल्ला केला आहे. झा यांनी म्हटंलय की, विरोधकांनी हे स्वीकारलं आहे की मतांद्वारे ते आम्हाला हरवू शकत नाहीत. म्हणूनच, ते अशाप्रकारची कृत्ये करत आहेत.
#Correction: Onions pelted during Chief Minister Nitish Kumar's election rally in Madhubani's Harlakhi.#BiharPolls pic.twitter.com/0NwXZ3WIfm
— ANI (@ANI) November 3, 2020
त्यांनी म्हटलं की, विरोधकांना पुरतं कळलं आहे की, ते बिहारला त्या काळात घेऊन जातील जिथून नितीश कुमारांनी बिहारला बाहेर आणलं होतं. हा हल्ला जीवघेणा होता. नितीश यांना निवडायचं की नाही याचा निर्णय आपल्या मतांद्वारे जनता करेल मात्र, अशाप्रकारचा हल्ला करुन आपण काय दाखवू इच्छिता? जनता सगळं काही जाणून आहे.
हेही वाचा - भारतीय सैन्याने यंदा 200 दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, सर्वाधिक 'या' संघटनेचे
याआधी मुजफ्फरपूरच्या सकरामध्ये एका प्रचारसभे दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या हेलिकॉप्टरकडे एका व्यक्तीने चप्पल फेकली होती. अर्थातच चप्पल हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचली नाही. चप्पल फेकली तेंव्हा नितीश मंचारवर होते. पोलिसांनी यासंदर्भात तीन लोकांना ताब्यात घेतलं आहे.
बिहार विधानसभेसाठी सध्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार असून या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.