भारतीय सैन्याने यंदा 200 दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, सर्वाधिक 'या' संघटनेचे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

मिळालेल्या माहीतीनुसार, दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक एन्काऊंटर पहायला मिळाले आहेत.

नवी दिल्ली : यावर्षीच्या ऑक्टोबर अखेरपर्यंत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या संघटनांशी निगडीत 200 दहशतवाद्यांचा खातमा केला असल्याची माहीती समोर आली आहे. गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी 157 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं होतं. सुरक्षा दलांनी याबाबतची माहीती दिली असून याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. भारतीय सैन्यामधील केंद्रीय राखीव पोलिस दल, भारतीय सेना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी जूनमध्ये 49  दहशतवाद्यांना ठार केले होते. एका महिन्यात इतके दहशतवादी मारले जाण्याची ही पहिलीच घटना होती. 

हेही वाचा - काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना देशाने नाकारलं; बिहार-युपीत दयनीय अवस्था

दरम्यान, एप्रिलमध्ये 28 दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये मारले गेले तर जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी 21 दहशतवादी मारले गेले आहेत. 
मिळालेल्या माहीतीनुसार, दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक एन्काऊंटर पहायला मिळाले आहेत. ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण 138 दहशतवाद्यांचा बिमोड तिथे केला गेला आहे. शोपियान आणि पुलवामा भागात स्थानिक तरुणांची भरती या दहशतवादी गटात पहायला मिळाली होती ज्यामधील दोन्ही भागात प्रत्येकी 49 याप्रमाणे एकूण 98 दहशतवाद्यांना कंठस्नान देण्यात आले आहे. 

पाकिस्तान आर्मीद्वारे पाठिंबा दिल्या गेलेल्या हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सर्वांत जास्त म्हणजे 72 दहशतवादी भारतीय सुरक्षा  दलाकडून मारले गेले आहेत. इंचेलेक्च्यूअल इनपुटकडून मिळालेल्या माहीतीनुसार, पाकिस्तान आयएसआय आणि आर्मीच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटल्यानंतर हिजबूलला काश्मीर भागात असंतोष आणि स्थानिक लोकांना लक्ष्य करण्याची कामगिरी दिली गेली होती. तसेच, लष्कर-ए-तोयबाचे 59 दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून मारले गेले आहेत. 

हेही वाचा - खुशखबर : लशीआधीच औषध येण्याची शक्यता; दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी

मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत सुरक्षा दलावर हल्ले करण्याची जबाबदारी एलईटीला देण्यात आली आहे, पोलिसांच्या आणि राजकीय हत्या करण्याचे काम हिजबुलला सोपविण्यात आले होते. जैश-ए-मोहम्मदचे 37 दहशतवादी सुरक्षा दलांनी मारले आहेत तर इतर अनेक संघटनांचे 32 दहशतवादीही मारले गेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 terrorists killed this year in J-K by indian security forces mostly from Hizbul