आयटीआयची परीक्षा कर्नाटकात आता ऑनलाईन

विकास पाटील
बुधवार, 26 डिसेंबर 2018

निपाणी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षा २०१९ पासून ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. भ्रष्टाचारमुक्त परीक्षेसह शिक्षकांचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारने ही पाऊले उचलली आहेत.

निपाणी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षा २०१९ पासून ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. भ्रष्टाचारमुक्त परीक्षेसह शिक्षकांचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारने ही पाऊले उचलली आहेत. ऑनलाईन परीक्षेचा निकालही तातडीने लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. कोणत्याही नोकरीसाठी त्यांना आता प्रमाणपत्रांची प्रतीक्षा करावी लागणार नाही.

२०१९ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेत केवळ इंजिनिअरींग ड्राईंगची लेखी व प्रात्यक्षिक (प्रॅक्‍टीकल) परीक्षा द्यावी लागणार आहे. एक पेपर लेखी असून ड्रॉईंगचाच सराव करावा लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर अवलंबून आहे. या परीक्षेमध्ये गुण वाढीसाठी वशिला लावावा लागायचा. हुशार विद्यार्थ्यांएवढेच इतर विद्यार्थ्यांना गुण मिळू लागल्याने परीक्षा निकालात पारदर्शकता राहिलेली नव्हती. त्याचा फटका हुशार विद्यार्थ्यांना बसत होता. शासनाने २०१७ मध्ये सेमीस्टर परीक्षा, २०१८ मध्ये थेट वार्षिक परीक्षा आता त्यामध्ये पुन्हा पारदर्शकता येण्यासाठी २०१९ पासून ऑनलाईन परीक्षा सुरु केली आहे.

कर्नाटक राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीत २०१९ पासून आयटीआयची वार्षिक परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षा केंद्रांचे नियोजन सुरू असून सर्व सोयींनी युक्त असलेल्या केंद्रावरच या परीक्षा घेतल्या जातील. देशात सर्वत्र या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत.
-बसवप्रभू, 

उपसंचालक, कर्नाटक राज्य आयटीआय विभाग, हुबळी

या परीक्षेमुळे होणार फायदे

 •     कॉपी व भ्रष्टाचारमुक्त परीक्षा.
 •     दर्जेदार विद्यार्थी, गुणामुळे कंपन्यांना फायदा.
 •     प्रशिक्षण चांगले मिळाल्याने नोकरीच्या संधी.
 •     तपासणी व पेपर खर्चाची बचत.

अशी होणार परीक्षा

 •     प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेपूर्वी आयडी व पासवर्ड मिळेल.
 •     प्रत्येकांची प्रश्‍नपत्रिका वेगळी राहणार.
 •     निर्धारित वेळ संपल्यानंतर मशिन ऑफलाईन होणार.
 •     विद्यार्थ्यांनी १५ मिनिटे आधी केंद्रावर असणे बंधनकारक.
 •     मोठ्या सरकारी संस्थेमध्ये आसन व्यवस्थेच्या ठिकाणी परीक्षा.
 •     मोठ्या कंपनीकडून परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी

केंद्राने घ्यावयाची काळजी

 •     केंद्रात विजेसह बॅटरी बॅकअपची सोय करावी.
 •     सर्व्हर डाऊन होऊ नये, अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान.
 •     प्रत्येक विद्यार्थ्याला सुस्थितीतील संगणक मिळावा.

महाराष्ट्रात ही परीक्षा पद्धती २०१७ पासून सुरू केली आहे. येथील सेमिस्टरही ऑनलाईन होत होती. आता केवळ सर्वत्र थेट ऑनलाईन वार्षिक परीक्षाच होणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना सोयीचे झाले आहे.’
- सचिन ऐनापुरे,
सरकारी आयटीआय, कोल्हापूर

कर्नाटकात २०१९ पासून ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्‍चितच होईल. जे विद्यार्थी हुशार आहेत ते चांगले गुण मिळवून भविष्यात चांगली नोकरीही करतील. हा उपक्रम प्रेरणादायी आहे.
- सुरज पोवार,
आयटीआय विद्यार्थी, नांगनूर

Web Title: Online Examination of ITI in Karnataka