काश्मीरमध्ये जवानांच्या 280 तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

श्रीनगरची चहूबाजूंनी नाकाबंदी केली असून येणाऱ्या- जाणाऱ्यांची अत्यंत कडक तपासणी होत आहे. काही दुर्गम भागातील धार्मिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. येथील जवानांवर हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात जवानांच्या 280 तुकड्या (एका तुकडीत शंभर जवान) तैनात करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश जवान हे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे असतील. काश्मीरच्या राज्यपालांनी सुरक्षेबाबत अफवा पसविण्यात आल्या असून, विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

श्रीनगरची चहूबाजूंनी नाकाबंदी केली असून येणाऱ्या- जाणाऱ्यांची अत्यंत कडक तपासणी होत आहे. काही दुर्गम भागातील धार्मिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. येथील जवानांवर हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काश्‍मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर जवान तैनात केल्याबाबत विचारले असता राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले, की निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून येथे मोठी सुरक्षा आहेच. मात्र, काश्‍मीर खोऱ्यात दहशतवादी अधिक हिंसा घडवून आणण्याची शक्‍यता असल्यानेच सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट केली जात आहे.

यात्रामार्गावर भूसुरुंग आणि शस्त्रे 
अमरनाथ यात्रेला दहशतवादाचा धोका असल्याचा गुप्तचरांचा अहवाल आल्यानंतर लष्कराने यात्रामार्गावर सगळीकडे शोध मोहीम सुरू केली आहे. या वेळी लष्कराला यात्रामार्गावर पाकिस्ताननिर्मित भूसुरुंग आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आढळून आला. अत्याधुनिक स्फोटकांचा (आयईडी) वापर करून दहशतवादी हल्ला करण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले होते, असे लेफ्टनंट जनरल सरबजितसिंह धिल्लन यांनी सांगितले. या माहितीवरून लष्कराने शोधमोहीम राबविली असता शस्त्रांचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये पाकिस्तान दारूगोळा कारखान्याचा शिक्का असलेला भूसुरुंग आणि अमेरिकी बनावटीची स्नायपर रायफल एम-24 यांचा समावेश होता. धिल्लन यांनी शस्त्रसाठा सापडल्याचे ठिकाण जाहीर करण्यास नकार दिला. सीमेवर शांतता असली तरी सुरक्षा दले पूर्णपणे सावध आहेत, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Operation Kashmir security forces alerted in Jammu and Kashmir