
नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या पतींना ठार मारले होते. यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष या मोहिमेत आणि त्यानंतर भारताने घडविलेले नारीशक्तीचे दर्शन जगभर चर्चेचा विषय ठरले आहे. विशेष म्हणजे देशाला या कारवाईची माहिती देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांतील दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देखील खुद्द पंतप्रधान मोदी यांनी सुचविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह या लष्करातील महिला अधिकाऱ्यांनी सादर केला. या दोघींच्या माध्यमातून केंद्राने धार्मिक ऐक्याचा संदेश दिला आहे.