पनीरसेल्वम भाजपसोबत जाणार? संकेत देणारे ट्टिट डिलीट!

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

तमिळनाडूतील एआयडीएमकेचे नेते ओ. पनीरसेल्वम हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याचे संकेत त्यांनी ट्‌विटरद्वारे दिले आहेत. मात्र, त्यानंतर काही वेळातच हे ट्‌विट डिलीट करण्यात आले.

नवी दिल्ली - तमिळनाडूतील एआयडीएमकेचे नेते ओ. पनीरसेल्वम हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याचे संकेत त्यांनी ट्‌विटरद्वारे दिले आहेत. मात्र, त्यानंतर काही वेळातच हे ट्‌विट डिलीट करण्यात आले.

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. एआयडीएमकेमध्ये शशिकला आणि पनीरसेल्वम असे दोन गट पडले आहेत. त्यातच जयललिता यांच्या आरके नगर येथील विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, शशिकला यांच्या गटावर मतदारांना पैसे दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी शशिकला यांचे सहकारी टीटीव्ही दिनकरन यांची ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, ओ. पनीरसेल्वम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याचे संकेत त्यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिले आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केले.'आम्ही भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक निवडणुका जाहिर झाल्यानंतर घेणार आहोत', असे ट्‌विट त्यांनी केले होते. हे ट्‌विट डिलीट केल्यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्‌विट केले. त्यात म्हटले आहे की, "आम्हाला असे म्हणायचे होते की, स्थानिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही कोणत्या पक्षासोबत युती करायची याचा निर्णय घेणार आहोत.' याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. दरम्यान ओ. पनीरसेल्वम यांचे @OfficeOfOPS हे ट्‌विटर हॅंडल ट्‌विटरद्वारे अधिकृत करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे.

Web Title: OPS Tweet On Alliance With BJP Kicks Up Storm In Tamil Nadu, Deleted Later