कोरोना जात नाही तोच दुसरं संकट! देशात अज्ञात आजाराने 200 जण आजारी

वृत्तसंस्था
Sunday, 6 December 2020

अज्ञात आजारामुळे किमान २०० जण आजारी पडल्याचे निदर्शनास आले आहे.

विशाखापट्टणम- आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरूमध्ये अज्ञात आजारामुळे किमान २०० जण आजारी पडल्याचे निदर्शनास आले आहे. एलुरूच्या सरकारी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काल शनिवारी ५५ जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. दुपारपर्यंत ही संख्या २००वर पोहोचली. रुग्णालयात दाखल केलेल्या सर्वांना चक्कर येणे, डोकेदुखी आणि अपस्मार यासारखी लक्षणे दिसत होती. या सर्वांवर उपचार करण्यात आल्यानंतर रविवारी सायंकाळी अनेकांना घरी सोडण्यात आले.

आजीबाईची कमाल! कोरोनावर मात करुन साजरा करणार 100 वा वाढदिवस

या सर्वांचे रक्ताचे तसेच खाण्या-पिण्याचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्व रुग्णांचे सीटी स्कॅन आणि एक्सरे अहवाल सामान्य आहेत. ही लक्षणे आढळून आल्याने रुग्णालयात आलेले रुग्ण विविध भागांतील आहेत. त्यांचा एकमेकांशी संपर्कही आलेला नाही, सध्या रुग्णालयात ७६ महिला आणि ४६ मुलांसह इतर काही जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

नवीन प्रकरणे आढळून येत असल्याने एका मेडिकल टीमने एलुरुचा दौरा केला आणि समस्या जाणून घेण्यासाठी अनेक गोष्टींचे निरीक्षण केले. या सर्व रुग्णांचा ब्लड सँपल घेऊन तपास करण्यात आला, ज्यात सर्वांचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. एका सहा वर्षाच्या मुलीची प्रकृती गंभीर बनली होती, त्यामुळे तिला विजयवाडा येथे हलण्यात आले. खबरदारी म्हणून विजयवाडा येथे एक आपत्कालीन मेडिकेयर सेंटर सुरु करण्यात आले आहे. 

8 डिसेंबरच्या 'भारत बंद'ला देशव्यापी स्वरुप; काँग्रेससह डझनभर...

घाबरण्याचे कारण नाही

आरोग्यमंत्री अल्ला नानी यांनी रविवारी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. एलुरुमध्ये 150 बेड आणि विजयवाडामध्ये 55 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीला हाताळता येईल, असं ते म्हणाले आहेत. पुढे अल्ला नाही म्हणाले की, ''लोकांच्या जीवाला कोणताही धोका नाही आणि लोकांनी याबाबत जास्त विचार करु नये. कारण सरकार सर्व आवश्यक ते पाऊलं उचलत आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी स्वत: या स्थितीकडे लक्ष ठेवून आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 200 hospitalised as mystery disease strikes parts of Eluru in Andhra Pradesh