चिदंबरम यांची अटक जाणीवपूर्वक लांबवली

P Chidambaram
P Chidambaram
चिदंबरम यांच्या ठावठिकाण्याची माहिती असल्याचा तपास यंत्रणांचा दावा
नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 20) व्यक्त केले. या निर्णयाविरोधात तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिल्याने चिदंबरम कालपासून अटकेपासून बचाव करण्यासाठी फिरत आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी काल त्यांच्या निवासस्थानी पोचले; मात्र चिदंबरम तेथे नव्हते. त्यानंतर चिदंबरम गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र यातील आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे चिदंबरम काल रात्री कोठे होते, याची माहिती या तपास यंत्रणांना होती, तरीही त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यात आली नाही.

नॉर्थ ऍव्हेन्यूतील घरात चिदंबरम
चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर "सीबीआय' आणि "ईडी'चे अधिकारी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी जोरबाग येथील "115ए' या त्यांच्या निवासस्थानी पोचले होते. पण चिदंबरम तेथे उपस्थित नव्हते. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार चिदंबरम काल रात्री कोठे थांबले होते, हे तपास यंत्रणांना माहीत होते. ते नॉर्थ ऍव्हेन्यू येथील एका घरात थांबले असल्याची माहिती एका गुप्तचर संस्थेने दिल्याचा दावा तपास यंत्रणांच्या सूत्रांनी केला आहे. तपास यंत्रणांच्या मनात आले असते तर चिदंबरम यांना सहज अटक होऊ शकली असती. विशेष म्हणजे त्यांचा फोन काल रात्रीपर्यंत सुरूच होता. या प्रकरणी सर्व आदेश वरिष्ठ पातळीवरून येत होते.

केवळ भीती दाखविण्याचा हेतू
चिदंबरम यांच्या निवासस्थानी "सीबीआय' आणि "ईडी'ची दोन पथके धडकली. मात्र त्यांचा हेतू केवळ भीती निर्माण करणे हा होता. या पथकांनी त्यांच्या घराबाहेर नोटीस डकवून दोन तासांत तपास यंत्रणांसमोर उपस्थित राहण्याची तंबी दिली होती. चिदंबरम घरी न आल्याने या दोन्ही पथकांना रात्री उशिरा रिकाम्या हातांनी परतावे लागले. "सीबीआय'चे एक पथक आज सकाळपासूनच त्यांच्या घरी उपस्थित होते. चिदंबरम यांच्याविरोधात "लुकआऊट' नोटीसही बजावली आहे.

रस्त्यातच बदलली मोटार
सूत्रांच्या सांगण्यानुसार काल सायंकाळी चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. तेथून निघाल्यानंतर जोरबाग येथील निवासस्थानी पोचले नाहीत. तपास यंत्रणांकडून त्यांना अटक होऊ शकते, या सुगावा त्यांना लागला होते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातून निघताना ते ज्या गाडीत बसले होते, ती त्यांच्या निवासस्थानी पोचली, पण चिदंबरम मध्येच उतरून दुसऱ्या गाडीने गेले. रात्री आठपर्यंत त्यांचा फोनही सुरू होता. त्यानंतर मात्र तो बंद झाला.

उशिरा समजला ठावठिकाणा
या प्रकरणी तपास यंत्रणांनी दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाची मदत घेऊन चिदंबरम कोठे थांबले आहेत याची माहिती रात्री 11 वाजता काढली. आदेश मिळाला असता तर त्यांना अटक केली असती, असा दावा तपास यंत्रणांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेतल्यानंतरच सरकार याबाबत पुढील पाऊल उचलण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

हंगामी संरक्षणासाठी पुन्हा याचिका
चिदंबरम यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत हंगामी संरक्षणाची मागणी केली. न्यायालय क्र.3 मध्ये न्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्याकडे याचिका दाखल करून त्यावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली होती. मात्र न्या. रमणा यांनी ही याचिका मुख्य न्यायाधीशांकडे पाठविणार असून तेच यावरील सुनावणीचा निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

अटकेच्या अटकळीपूर्वी...
- "सीबीआय' व "ईडी'चे पथक मंगळवारी (ता. 20) चिदंबरम यांच्या घरी
- चिदंबरम घरी पोचलेच नाहीत
- सर्वोच्च न्यायालयातून निघाल्यानंतर मधून झाले गायब
- घराबाहेर नोटीस डकवून दोन तासांत तपास यंत्रणांसमोर उपस्थित राहण्याची तंबी
- चिदंबरम यांच्या शोधासाठी गुप्तचर विभागाची मदत
- नॉर्थ ऍव्हेन्यू येथील एका घरात थांबल्याची माहिती
- "सीबीआय'चे एक पथक आज सकाळपासूनच त्यांच्या घरी हजर
- चिदंबरम यांच्याविरोधात "लुकआऊट' नोटीस
- आदेश मिळाला असता तर अटक केली असती, असा तपास यंत्रणांचा दावा
- चिदंबरम यांची हंगामी संरक्षणासाठी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका
- तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
- न्या. रमणा यांनी मुख्य न्यायाधीशांकडे पाठविली याचिका
- याचिकेवर शुक्रवारी (ता.23) होणार निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com