पाकमुळे अडलेला भारताचा गहू अफगाणकडे जाणार? खान म्हणतात, 'माणुसकीने विचार केला तर...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाकमुळे अडलेला भारताचा गहू अफगाणकडे जाणार? खान म्हणतात, 'माणुसकीने विचार केला तर...'

पाकमुळे अडलेला भारताचा गहू अफगाणकडे जाणार? खान म्हणतात, 'माणुसकीने विचार केला तर...'

नवी दिल्ली: गेल्या ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तान देशावर ताबा मिळवला आहे. मात्र, तालिबान्यांनी हाती घेतलेल्या या सत्तेमुळे अफगाणिस्तानचं आबाळ व्हायची वेळ आली आहे. दहशतवादी म्हणून गणल्या गेलेल्या तालिबानने साऱ्या देशावर ताबा मिळवला असला तरी शासन कसं चालवायचं, याची तसूभरही कल्पना नसणारा तालिबान आता अफगाणी लोकांच्याच जीवावर उठला आहे, असं म्हणता येईल, अशीच काहीशी दुर्दैवी परिस्थिती तिकडे आहे. याचं कारण असं की, आर्थिक आघाड्यांवर अफगाणिस्तान देश सध्या रसातळाला निघाला असून सामान्य लोकांच्या दोनवेळच्या जेवणाची सुद्धा पंचायत होत आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानला असलेली मदतीची गरज लक्षात घेता भारताने धान्य पाठवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, भारताच्या या मदतीसाठी पाकिस्तानचीही गरज लागणार होती. पाकिस्तान मदतीचा हात पुढे करुन अफगाणिस्तानच्या भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताची मदत करेल का, याबाबत साशंकता होती. मात्र, आता हा प्रश्न निकाली निघाला आहे.

हेही वाचा: संप मिटविण्याच्या हालचालींना वेग

काय आहे हे प्रकरण?

भारताने अनेकदा अफगाणिस्तानला आवश्यक ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलंय. अफगाणिस्तानला मदत म्हणून भारत सरकारने ५० हजार मेट्रीक टन गहू पाठवण्याची तयारी केली आहे. मात्र, हे धान्य अफगाणिस्तानपर्यंत नेण्यासाठी करावं लागणारी वाहतूक ही पाकिस्तानमधून होणार आहे. गहू ट्रकमधून अफगाणिस्तानमध्ये पाठवायचा असल्याने हे ट्रक पाकिस्तानमधून जाऊ द्यावेत, अशी विनंती भारताने पाकिस्तानाी शासनाकडे केली आहे. भारताकडून येणारा हा गहू पाकिस्तानमधून वाहतुक करत यावा, अशी मागणी तालिबाननेही पाकिस्तान सरकारकडे केली होती. आधीच अडचणीत असलेल्या अफगाणी नागरिकांची हिवाळ्यामध्ये धान्य तुटवडा होऊ आणखी दयनीय अवस्था होऊ नये म्हणून चीन, टर्कीसारख्या देशांनीही मागील आठवड्यापासून अफगाणिस्तानमध्ये धान्य पाठवण्यास सुरुवात केलीय.

हेही वाचा: जैविक इंधनाचा वापर बंद करण्यास काही देशांचा विरोध

पाकिस्तानने केली मागणी मान्य

अफगाणिस्तामध्ये हे धान्य पाठवता यावं, यासाठी सहकार्य करण्यासंदर्भात भारताने पाकिस्तानकडे मागील महिन्यामध्ये एक विनंती केली होती. ही वाहतुक जमीनीवरुन म्हणजेच रस्ते वाहतुकीच्या मार्गाने व्हावी आणि त्यासाठी भारताचे ट्रक पाकिस्तानमार्गे अफगाणकडे जाऊ द्यावेत, अशी मागणी भारताने केली आहे. आणि ही मागणी आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केली आहे. मात्र, भारताच्या मागणीऐवजी तालिबानी सरकारने केलेली विनंती मान्य केली असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय. ते म्हणालेत की, पाकिस्तान हा इस्लामी देश 'अनुकूल रितीने' भारताद्वारे देऊ केलेल्या गव्हाची वाहतूक करण्याच्या तालिबान सरकारच्या विनंतीवर "अनुकूल" विचार करेल. माणुसकीच्या नात्यातून भारताकडून मदत म्हणून देऊ केलेला गहू 'अपवादात्मक परिस्थितीत' देशातून वाहतुक करत अफगाणिस्तानात नेण्याची परवानगी देऊ करेल.

हेही वाचा: केरळमध्ये आलं 'नोरोव्हायरस'चं संकट; काय आहे हा व्हायरस?

गेल्या महिन्यात केली होती मागणी

ही मदत अफगाणिस्तानकडे लवकरात लवकर रवाना व्हावी यासाठी भारताने पाकिस्तानकडे विनंती अर्ज केला होता. मात्र धान्य असणाऱ्या ट्रकची संख्या आणि त्यामधील माल पाहता रस्ते योग्य आहेत की नाही याची चाचपणी करावी लागणार असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं होतं. पाकिस्तानने यासाठी लगेचच संमती दिलेली नव्हती. जर भारतीय ट्रकना परवानगी मिळाली नसती तर वाघा अटारी सीमेजवळ भारताचा सर्व गहू ट्रकमधून उतरवून तो पाकिस्तानी ट्रकमध्ये भरुन पाठवावा लागला असता. मात्र हे काम अर्थातच जिकरीचं ठरणार होतं. त्यामुळेच अफगाणिस्तानमधील लोकांना मदत करण्यासाठी पाकिस्तान भारताचं सहकार्य करेल अशी अपेक्षा भारतीय अधिकाऱ्यांना असल्यानेच त्यांनी ही विनंती केली होती.

loading image
go to top