घाबरलेल्या पाकची भारताकडे याचना गोळीबार थांबविण्याची "बीएसएफ'ला विनंती 

पीटीआय
सोमवार, 21 मे 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या जम्मू-काश्‍मीर दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार होत होता. या वर्षात पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफगोळ्यांचाही मोठ्या प्रमाणात मारा झाला आहे. 

जम्मू : जशास तसे उत्तर देताना भारताने केलेल्या तुफान प्रतिहल्ल्याने भांबावून गेलेल्या पाकिस्तान रेंजर्सने भारताच्या सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) गोळीबार थांबविण्याची अक्षरश: याचना केली. "बीएसएफ'च्या प्रवक्‍त्याने आज ही माहिती दिली. 

या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सैनिकांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले. याला प्रत्युत्तर म्हणून "बीएसएफ'च्या जवानांनी गेले तीन दिवस अत्यंत नियोजनबद्ध आणि सातत्याने अचूक मारा करत पाकिस्तानी सैनिकांना जेरीस आणले. भारताच्या या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचा एक सैनिक मारला गेला; तर त्यांच्या ठाण्यांचेही मोठे नुकसान झाले. हे नुकसान दाखविणारी थर्मल इमेजही "बीएसएफ'ने प्रसिद्ध केली आहे. भारताच्या या प्रतिकाराने घाबरलेल्या पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकाऱ्याने जम्मूतील बीएसएफच्या तळाशी दूरध्वनीवरून संपर्क करत गोळीबार थांबविण्याची याचना केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या जम्मू-काश्‍मीर दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार होत होता. या वर्षात पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफगोळ्यांचाही मोठ्या प्रमाणात मारा झाला आहे. 

Web Title: pak request of the BSF to stop the fire