पाकमधील टॅंकर स्फोटातील मृतांची संख्या 218 वर

पीटीआय
शुक्रवार, 7 जुलै 2017

पाकिस्तानमध्ये पेट्रोल टॅंकरचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेतील आणखी 12 गंभीर जखमींचा मृत्यू झाला आहे. यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या 218 झाली आहे.

लाहोर - पाकिस्तानमध्ये पेट्रोल टॅंकरचा स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेतील आणखी 12 गंभीर जखमींचा मृत्यू झाला आहे. यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या 218 झाली आहे.

ईदच्या आधी 25 जूनला बहावलपूर येथे पेट्रोल टॅंकर उलटला होता. या टॅंकरमधील ऑइल गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. टॅंकरचा अचानक स्फोट झाल्याने 120 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच, 140 जण जखमी झाले होते. यातील अनेक जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांत लाहोर आणि मुलतान येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 218 झाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवून सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या दुर्घटनेतील आणखी 49 जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. या जखमींवर उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्‍टर आणि कर्मचारी पंजाब प्रांतात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. गेली अनेक वर्षे या रुग्णालयांमध्ये प्लॅस्टिक सर्जरी करणारे डॉक्‍टर आणि भूलतज्ज्ञांची भरतीच झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title: pak tanker blast india news marathi news blast news