Indian Air Strike : पाक विमानांना पिटाळलं! 

PAF
PAF

श्रीनगर : भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्यानंतर आज उभय देशांतील तणाव आणखी वाढला, पाकिस्तानच्या विमानांनी बुधवारी सकाळी हवाई हद्दीचा भंग करत जम्मू-काश्‍मीरच्या नौशेरा भागात घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्न केला पण तोही हवाई दलाने उधळून लावला. भारताने प्रतिहल्ला करत पाकचे "एफ-16' हे विमान काश्‍मीर खोऱ्यातील राजौरी सेक्‍टरमधील लाम खोऱ्यात पाडले. भारताच्या लष्करी ठाण्यांना लक्ष्य करण्याचा पाकचा इरादा होता, असे परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. या हवाई संघर्षामध्ये भारताला एक "मिग-21' हे विमान गमवावे लागले असून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकच्या तावडीत सापडले आहेत. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने काल पाकिस्तानातील दहशतवादी तळ लक्ष्य केले होते. ही केवळ दहशतवादाविरुद्धची कारवाई होती, लष्करी कारवाई नव्हती, असेही भारताने स्पष्ट केले होते. तरीही त्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताच्या हद्दीत विमानांची घुसखोरी करून लष्करी ठाण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

या हवाई संघर्षामध्ये भारताची दोन विमाने पाडून दोन वैमानिकांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीशकुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली, पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसताच आपल्या हवाई दलाने तातडीने प्रतिकार केला. भारताच्या "मिग-21 बायसन' विमानाने पाकिस्तानचे एक विमान पाडले. या संघर्षामध्ये दुर्दैवाने आम्हाला आमचे एक "मिग-21' हे विमान गमवावे लागले असून यातील वैमानिकाचा ठावठिकाणा मात्र समजलेला नाही असेही रवीशकुमार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर हेही उपस्थित होते. दरम्यान, भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे लष्करी कारवाईदरम्यान पाकिस्तानच्या तावडीत सापडले असल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वर्धमान यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अवघा देश एकवटला अन्‌ सोशल मीडियावर काही क्षणांमध्ये "ब्रिंग बॅक अभिनंदन'चे ट्रेंड दिसू लागले. वर्धमान यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो प्रसिद्ध करणाऱ्या पाकला भारताने खडे बोल सुनावत त्यांना सोडवून आणण्याचा निर्धार केला. 

इमरान यांचा चर्चेचा सूर 
भारताच्या आक्रमक प्रत्युत्तरानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुन्हा एकदा चर्चेचा सूर आळवला असून दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्‍न सोडवावेत असे मत त्यांनी मांडले. दोन भारतीय विमाने आमच्या हद्दीत घुसल्याचा कांगावाही त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे इमरान यांनी चर्चेचा प्रस्ताव भारतापुढे ठेवतानाच अंतर्गत पातळीवर मात्र आण्विक मंडळाची बैठक घेत युद्धाच्या तयारीचा आढावा घेतला. यामुळे इमरान यांच्या चर्चेच्या प्रस्तावाला कितपत महत्त्व द्यायचे असा सवालही तज्ज्ञांकडून केला जात आहे. 

दिवसभरात 
- पाकची हवाई हद्द बंद, आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित 
- बहारिनची पाकच्या दिशेने होणारी उड्डाणेही रद्द 
- देशभरातील रेल्वे यंत्रणेला सावधगिरीचे आदेश 
"पीएमओ'त वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक 
जम्मू, श्रीनगर, चंडीगड विमानतळांवरील उड्डाणे रद्द 
दिल्लीपासून वरील हवाई हद्द रिकामी करण्यात आली 
सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले 
सीमेवरील लष्कर, बीएसएफला सावधगिरीचा इशारा 
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून प्रत्युत्तर 
गृहमंत्र्यांच्या बैठकीस "रॉ'चे अधिकारी, सुरक्षा सल्लागार उपस्थित 
ंमुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील सुरक्षा वाढविली 
अमेरिकाही भारताच्या पाठीशी, पाकला खडसावले 
पंतप्रधान मोदींची वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांशी खलबते 
पाक उच्चायुक्तांना भारताचे समन्स 
विरोधी पक्षांकडून हवाई दलाच्या कारवाईचे कौतुक 
भारताच्या हल्ल्यात चार नागरिक मरण पावल्याचा पाकचा कांगावा

भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुखरूपपणे भारतात येत नाही तोवर पंतप्रधानांनी सर्व राजकीय व्यवहार थांबवावेत, तसेच विरोधी पक्षांनीदेखील दिल्लीतील बैठका रद्द कराव्यात. 
- उमर अब्दुल्ला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स 

भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक बेपत्ता असल्याचे समजल्याने अत्यंत वाईट वाटले, तो लवकरच सुखरूप घरी परतेल, अशी आशा करतो. या आणीबाणीच्या स्थितीमध्ये आम्ही आमच्या लष्करासोबत ठामपणे उभे आहोत. 
- राहुल गांधी, अध्यक्ष कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com