J&Kचा बदला म्हणून पाकचा गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा; भारताने सुनावले खडेबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 1 November 2020

भारताचा विरोध असतानाही पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानने तात्पुरत्या स्वरुपात प्रांताचा दर्जा दिला आहे.

इस्लामाबाद: भारताचा विरोध असतानाही पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानने तात्पुरत्या स्वरुपात प्रांताचा दर्जा दिला आहे. यावर भारताने संतप्त प्रतिक्रिया दिली असून पाकिस्तान या माध्यमातून आपले काळे काम लपवत असल्याचे म्हटलं आहे. पाकिस्तानने ताबा घेतलेल्या या प्रदेशातील जनता गेल्या 7 दशकांपासून स्वातंत्र्यासाठी धडपडत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन तेथे होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले आहेत. पाकिस्तानने भारतीय भागांचा दर्जा बदलण्याऐवजी तात्काळ या भागावरील आपला अवैध ताबा काढून घ्यावा, असंही ते म्हणाले आहेत. 

भारतीय प्रदेशांचा दर्जा बदलण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. पाकिस्तानने बळजबरीने आणि अवैधरित्या हा भाग बळकावला आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख, तसेच गिलगिट आणि बाल्टिस्तान भारताचे अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार अनुराग श्रीवास्तव यांनी केला. गिलगिट बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देण्याचा पाकिस्तानला काहीही अधिकार नाही, असंही ते म्हणाले. 

इस्लामाबाद येथे स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तानला राज्याचा दर्जा देणार असल्याचे जाहीर केले होते. इम्रान खान यांनी रविवारी म्हटले की, गिलगिट बाल्टिस्तानला घटनात्मक अधिकार दिले जातील. तसेच नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जातील. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या नकाशातून पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचा भाग वगळण्याचा निर्णय घेतलेला असताना इम्रान खान यांनी निर्णय घेतला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan changed status of Gilgit Baltistan india  Anurag Srivastava comment