मुंबई हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडली करणार पाकिस्तानची पोलखोल

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 27 October 2020

मुंबई 26/11 हल्लातील दोषी डेव्हिड कोलमेन हेडलीविरोधात पाकिस्तानने खटला चालवावा, अशी मागणी भारताने केली आहे

नवी दिल्ली- मुंबई 26/11 हल्लातील दोषी डेव्हिड कोलमेन हेडलीविरोधात पाकिस्तानने खटला चालवावा, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच 2008 मुंबई हल्ल्यातील हेडलीची साक्ष समोर ठेवण्यास भारताने सांगितले आहे. मुंबई हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडली डेनमार्क आणि भारतात दहशतवादी कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेत 35 वर्षांची शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती, पण अमेरिकेने ती अमान्य केली आहे. 

मंगळवारी नवी दिल्लीत होणाऱ्या 2+2 बैठकीमध्ये मुंबई हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा उठवला जाणार आहे. सोबत पाकिस्तानने सीमेवरील आपल्या दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, यावर भारत भर देईल. 

भारत सरकारने या प्रकरणी मागील आठवड्यात इस्लामाबादला संदेश पाठवला होता. यामध्ये भारताने म्हटलं होतं की, टेलिकॉन्फ्रेंसिंगद्वारे मुंबईतील साक्षीदारांना चौकशीसाठी पाकिस्तानच्या न्यायिक आयोगासाठी उपलब्ध करुन देण्याची आमची तयारी आहे. भारताला असा विश्वास आहे की, हेडलीची कबुली आयएसआय संबंधी मोठे खुलासे करेल. तसेच त्याच्या कबुलीने मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानची भूमिका समोर येईल. मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता.

corona update: तीन महिन्यानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद; महामारीचा वेग मंदावला

हेडलीने दिली होती गुन्ह्याची कबुली

डेव्हिड हेडलीने अमेरिका आणि भारतीय एजेंसीसमोर आपला गुन्हा कबुल केला होता. त्याने आयएसआयच्या सांगण्याने दहशतवादी कारवाया केल्या होत्या. डेव्हिडने लश्कर-ए-तैयब्बाबाबतही मोठे खुलासे केले होते. हेडली मुंबई हल्ला प्रकरणातील सरकारी साक्षीदार बनला आहे. अमेरिकी कायद्यानुसार, तेथील कोर्टाने डेविडला दोषी ठरवले असल्याने त्याचे भारत किंवा पाकिस्तानकडे प्रत्यार्पण होऊ शकत नाही. 

सांगितले जाते की, भारत, पाकिस्तान किंवा डेन्मार्ककडे प्रत्यार्पण न करण्याच्या अटीवरच हेडली सरकारी साक्षिदार बनण्यास तयार झाला होता. पण, यूएस अॅटोर्नी कार्यालयाच्या निर्देशानुसार, हेडली व्हर्चुअल पद्धतीने कोणत्याही विदेशी कार्यवाहीमध्ये किंवा साक्ष देण्यामध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानकडे हेडलीविरोधात खटला सुरु करण्याचा पर्याय खुला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan devid headly 2008 mumbai terror attack india want prosecute him