पाककडून जाणीवपूर्वक नागरी भाग लक्ष्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

'बीएसएफ'चा दावा; भारताने केवळ बंकर नष्ट केले
जम्मू - पाकिस्तानी लष्कराची त्यांच्या रेंजर्सच्या कुरापतीला फूस आहे. पाकने जाणीवपूर्वक सीमावर्ती भागातील नागरी वस्त्यांना लक्ष्य करून तोफगोळ्यांचा मारा केला असे प्रतिपादन सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी. के. उपाध्याय यांनी आज केले. पाककडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा लेखाजोखाच उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत मांडला.

शस्त्रसंधी उल्लंघनासाठी पाकिस्तानी रेंजर्संना त्यांचे लष्कर पाठिंबा देत असून, मागील काही दिवसांमध्ये पाकच्या सैनिकांनी अनेकवेळा गोळीबार केला. आता त्यांनी नागरी भागांना लक्ष्य करत तोफगोळे डागले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने आतापर्यंत कधीही त्यांच्या नागरी भागांवर हल्ला केला नाही. आम्ही फक्त पाकिस्तानी लष्कराचे बंकर नष्ट करतो. आताही आम्ही पाकिस्तानच्या चौदा बंकरचे मोठे नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या प्रतिहल्ल्यामध्ये पाकिस्तानचे काही नागरिक मारले गेले असतील तर त्याला कारणीभूत केवळ त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे. कारण बहुतांश लोक हे पाकिस्तानी लष्कराच्या बंकरजवळच राहतात असेही त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी मंगळवारी पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात आठ जण ठार तर अन्य 22 जखमी झाले होते. यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानच्या चौदा चौक्‍या उद्‌ध्वस्त झाल्या होत्या.

राजनाथ यांनी घेतला आढावा
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीमध्ये सीमावर्ती भागातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांच्यासह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीचा सविस्तर तपशील लष्कराने उघड केलेला नाही.

राज्यातील शाळा बंद
सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्‍मीर सरकारने राज्यातील चारशे शाळांना सुटी जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या बाजूने कधीही गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा मारा होऊ शकतो. यामध्ये निष्पाप मुलांचा बळी जाऊ नये म्हणून राज्य सरकारने ही खबरदारी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Pakistan firing forces shut 200 border schools in J&K