गरज पडल्यास घुसून शत्रूंना मारू: राजनाथसिंह

पीटीआय
रविवार, 21 जानेवारी 2018

काही महिन्यापूर्वी पाकिस्तानातून काही दहशतवादी घुसले होते आणि त्यांनी भ्याड हल्ला करत आपल्या 17 जवानांचा जीव घेतला. त्यानंतर पंतप्रधानांनी बैठक बोलावून यापुढे कडक धोरण अवलंबण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर आपले जवान जे पराक्रम गाजवत आहेत, ते आपल्याला सांगण्याची गरज नाही

लखनौ  - भारताची प्रतिमा आता जगात शक्तीशाली देश म्हणून समोर आली आहे. गेल्या काही महिन्यात भारतीय जवानांनी केलेली कामगिरी पाहता सीमेवरच नाही तर गरज पडल्यास भारतीय जवान आत घुसून शत्रूला ठार करु शकतात, असा संदेश जगाला दिला असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले. लखनौत रेल्वे श्रमिक संघाच्या एक दिवसीय महाधिवेशनात बोलताना राजनाथसिंह यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानच्या कारवायांवर टीका केली.

ते म्हणाले, की भारत आपल्या शेजारील देशांची चांगले संबंध राखू इच्छित आहे. मात्र पाकिस्तान अजूनही कुरापती करणे थांबवत नाही. देशाची मान ताठ राहील, असेच काम मोदी सरकारकडून होईल. भारत आता कमकुवत नाही तर शक्तीशाली देश म्हणून ओळखला जात आहे. काही महिन्यापूर्वी पाकिस्तानातून काही दहशतवादी घुसले होते आणि त्यांनी भ्याड हल्ला करत आपल्या 17 जवानांचा जीव घेतला. त्यानंतर पंतप्रधानांनी बैठक बोलावून यापुढे कडक धोरण अवलंबण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर आपले जवान जे पराक्रम गाजवत आहेत, ते आपल्याला सांगण्याची गरज नाही. भारताची प्रतिष्ठा जगात दिवसेंदिवस उंचावत आहे. पंतप्रधान देखील यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकास करत आहे. अर्थात जागतिक अर्थतज्ञांनी देखील हा विकास मान्य केला आहे.

Web Title: pakistan rajnath singh india