'पाकिस्तान 'जैश'चा प्रवक्ता'

'पाकिस्तान 'जैश'चा प्रवक्ता'

नवी दिल्ली : बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ले केलेल्या ठिकाणी पत्रकारांना प्रतिबंध करून पाकिस्तान बरेच काही लपवत आहे, असा हल्लाबोल भारताने आज केला. तसेच, दहशतवादी मसूद अजहरविरुद्धची कारवाई फक्त कागदावर असून, पाकिस्तान "जैशे-महंमद'च्या प्रवक्‍त्यासारखे वागत आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविताना, बालाकोटच्या कारवाईतून अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाल्याचा पुनरुच्चारही केला. 

बालाकोटमध्ये "जैशे-महंमद'च्या तळावरील हवाई दलाच्या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आज परराराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानची "जैशे-महंमद'विरुद्धची कारवाई केवळ कागदावर असल्याचा हल्ला चढवला. "जैशे-महंमद'ने पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची स्वतः जाहीरपणे जबाबदारी घेऊनही पाकिस्तान मात्र या हल्ल्यात "जैश'चा हात नाकारतो आहे. पाकिस्तानचे हे वर्तन "जैश'च्या प्रवक्‍त्यासारखे आहे, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी फटकारले. 
दहशतवादी संघटनांवर कारवाई केल्याचे पाकिस्तानतर्फे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात आजही तेथे दहशतवादी संघटनांचा मुक्त वावर आहे.

'जैशे-महंमद' विरुद्धच्या कारवाईत पाकिस्तान गंभीर नसून, ही कारवाई फक्त कागदावर आहे. याआधीही संसदेवरील हल्ला, मुंबईतील 26/11चा हल्ला, तसेच पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अशाच प्रकारचे दावे करण्यात आले होते. इम्रान खान यांच्या म्हणण्यानुसार "नवा पाकिस्तान' असेल, तर "नवा विचार आणि नवी कारवाई दाखवा', असा टोलाही रवीशकुमार यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com