'हार्ट ऑफ एशियात' पाकिस्तानच लक्ष्य

पीटीआय
रविवार, 4 डिसेंबर 2016

भारताची रणनीती; अफगाणिस्तानसोबत करार शक्‍य

भारताची रणनीती; अफगाणिस्तानसोबत करार शक्‍य
अमृतसर - नगरोटा येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून येथे सुरू झालेल्या "हार्ट ऑफ एशिया' कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानला घेरण्यासाठी भारताने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या संपूर्ण परिषदेमध्ये केवळ दहशतवादाचा मुद्दाच चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्‍यता आहे. भारत, चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसमवेत 14 देशांचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेत सहभागी झाले असून, अन्य 17 सहयोगी देशांच्या प्रतिनिधींचाही यामध्ये समावेश आहे. तालिबान्यांच्या संकटाचा सामना करणारा अफगाणिस्तानदेखील या परिषदेत कळीचा मुद्दा ठरणार असून भारत-अफगाणदरम्यान अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य करार होणे अपेक्षित आहे.

भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान हवाई मालवाहतुकीबाबतच्या करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता असून, तत्पूर्वी पाकने आपल्या प्रदेशातून या वाहतुकीस परवानगी नाकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे पंतप्रधान अश्रफ घनी यांच्यात या विषयावरदेखील चर्चा होऊ शकते.

अफगाणिस्तानलादेखील स्वत:ची शस्त्रसंपदा अधिक अद्ययावत करण्यासाठी भारताची मदत हवी आहे. या परिषदेला सुरवात होण्यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, अफगाणिस्तानच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही अधिकाऱ्यांनी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद हाच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी सर्वांत मोठा धोका असल्याचे मान्य केले.

काय आहे "हार्ट ऑफ एशिया'?
अमृतसरमध्ये होत असलेली "हार्ट ऑफ एशिया संघटने'ची ही सहावी परिषद असून, तिचा मुख्य उद्देश दहशतवाद नष्ट करणे हा आहे. या परिषदेची सुरवात 2 नोव्हेंबर 2011 मध्ये इस्तंबुलमध्ये झाली होती. अफगाणिस्तानामध्ये स्थैर्य आणि समृद्धी आणणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असून 14 देश या परिषदेचे सदस्य आहेत. या संघटनेमध्ये भारतासोबत अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, इराण, कझाकिस्तान, किर्घीस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान, तुर्कस्तान, तुर्केमिनिस्तान आणि संयुक्त अरब अमितराती यांचा समावेश आहे

अझीझ मोदींना भेटण्याची शक्‍यता
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अझीझ हे पूर्वनिर्धारित वेळापत्रकाच्या आधीच भारतात दाखल झाले असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अझीझ यांचे रविवारी भारतात आगमन होणार होते; पण ते शनिवारी सायंकाळीच भारतात डेरेदाखल झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: pakistan target in Heart of Asia