
ड्रोनद्वारे पाकमधून येतात ड्रग्स, हत्यारं; खलिस्तान्यांचा धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : हरियाणा पोलिसांनी मागच्या आठवड्यात कर्नाल भागातून चार संशयित दहशवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून आता धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आरडीएक्स सारखी धोकादायक स्फोटके आणि शस्त्रे पाकिस्तानमधून पंजाबमध्ये आणि देशाच्या इतर भागात नेली जात असल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं आहे.
दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली होती, त्यांनी आतापर्यंत ड्रोनद्वारे पाकिस्तानातून मिळालेली स्फोटके, शस्त्रे आणि ग्रेनेड तीन ठिकाणी पोहोचवले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आरोपींनी अमृतसर-तर्ण तारण महामार्ग आणि नांदेड-हैदराबाद महामार्गावर अशा दोन ठिकाणी शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
तिसऱ्या वेळेस तेलंगणामधील आदिलाबाद येथे जात असताना हरियाणातील कर्नाल येथे त्यांना स्फोटके आणि शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटक केली होती.आरोपी अमनदीप आणि गुरप्रीत यांनी सांगितलं की, पाकिस्तानातील बब्बर खालसा आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा हा ड्रोन वापरून पाकिस्तानातून अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे पाठवायचे, पाकिस्तानातून आलेले सर्व पदार्थ आणि शस्त्रे वितरीत करण्याचं काम या आरोपींवर असायचं.
आरोपींनी पाकिस्तानातून आलेले ड्रग्स पंजाबमधील एका व्यापाऱ्याला विकून पैसे घेतले तर स्फोटके, शस्त्रे आणि दारूगोळा नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचवले आहेत. तसेच तेलंगणामध्ये, पंजाब, हरियाणा, नांदेड अशा भागात त्यांनी शस्त्रे लपवून ठेवल्याचा संशय आहे.
यापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून दहशतवादाशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये अंमली पदार्थ जप्त केले होते. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली स्फोटके ही पाकिस्तानातून पंजाबमध्ये आल्याचं तपासातून समोर आलं होतं. दरम्यान पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट हाणून पाडला असून त्यांच्याकडे असलेला माल जप्त करण्यात आला आहे. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर अशी या चार संशयितांची नावे असून ते सर्व पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.