पाकिस्तानकडून पुन्हा राजौरी लक्ष्य

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

मागील चार दिवसांत पाकिस्तानने चारवेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, राजौरीमध्ये गोळीबार करण्याची पाकची ही दुसरी वेळ आहे. राजौरीतील चितीबाक्री परिसरामध्ये पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे समजते. पाकिस्तानच्या या ताज्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा सात खेड्यांना फटका बसला आहे

श्रीनगर - पाकिस्तानच्या सीमेवरील भारतविरोधी कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी सेक्‍टरमध्ये रविवारी पाक लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत तोफगोळ्यांचा मारा केला. यामुळे इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, एक हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या हल्ल्यास भारतीय लष्करानेही जशास तसे उत्तर दिले. आज पहाटे 6.45 च्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने 82 ते 120 मिलिमीटरचे तोफगोळे डागले. या वेळी लहान आणि स्वयंचलित शस्त्रांचाही वापर करण्यात आला, असे लष्कराचे प्रवक्‍ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले.

मागील चार दिवसांत पाकिस्तानने चारवेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, राजौरीमध्ये गोळीबार करण्याची पाकची ही दुसरी वेळ आहे. राजौरीतील चितीबाक्री परिसरामध्ये पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे समजते. पाकिस्तानच्या या ताज्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा सात खेड्यांना फटका बसला आहे. सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या 996 पेक्षाही अधिक लोकांना पुनर्वसन छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे.

शाळांना कुलूप
पाककडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे नौशेरा सेक्‍टरमधील 51 शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्या असून, मांजाकोटे आणि डुंगी परिसरातील 36 शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. साडेचार हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने शनिवारीही राजौरीमध्ये तोफगोळे डागले होते, यात दोन नागरिक ठार झाले होते यामध्ये लहान मुलीचाही समावेश होता. अन्य नऊ जखमींमध्ये चार सैनिकांचाही समावेश आहे.

छावण्या सुरू
आतापर्यंत या नौशेरात तीन मदत छावण्या कार्यान्वित करण्यात आल्या असून यात आणखी 28 छावण्यांची भर पडू शकते. गोळीबारामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने रूग्णालयामध्ये नेता यावे म्हणून सहा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. नौशेरामध्ये एक मोबाईल मेडिकल युनिटदेखील सुरू करण्यात आल्या आहे. मदत छावण्यांमध्ये वैद्यकीय सुविधा देण्यासाठी 120 अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्ष
शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे समजताच जिल्हा प्रशासनाने तातडीने स्थानिकांना मदत उपलब्ध करून दिली असून जखमींच्या नातेवाइकांना वित्तीय साह्य देण्यात आले. समन्वयासाठी नौशेरातील उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्येच एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून विविध विभागांशी समन्वय ठेवला जात आहे.

Web Title: Pakistan violates cease fire again