पाकचा कुटील डाव; काश्मीरमध्ये दहशतवादासाठी जैश, हिज्बूलकडे सोपवले काम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

भारताने कलम 370 संपुष्टात आणल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरला संघराज्याचा दर्जा दिल्यापासून पाकिस्तानी लष्कराची चरफड होत आहे.

इस्लामाबाद- जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेग आणण्यासाठी तालिबानच्या मदतीने कुटील डाव आखला आहे. बाजवा यांनी यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिज्बूल मुजाहिदीन आणि तालिबानच्या कमांडरबरोबर गुप्त बैठकही घेतली आहे. 

'हिंदुस्थान टाइम्स'च्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती मोहम्मद असगर खान काश्मिरीही या बैठकीला उपस्थित होता. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कृत्यांसाठी समन्वयकाचे तो काम करतो. भारतीय गुप्तचर संस्थांच्या मते, पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एकजुटता राहावी यासाठी सर्व दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांबरोबर बैठक केली. या बैठकीचा मुख्य उद्देश हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा आहे.

हेही वाचा- नितीश कुमारांनी चिराग यांच्यावर अन्याय केला; तेजस्वींच्या सहानुभूतीने नव्या चर्चांना उधाण

दरम्यान, भारताने कलम 370 संपुष्टात आणल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरला संघराज्याचा दर्जा दिल्यापासून पाकिस्तानी लष्कराची चरफड होत आहे. जैश, लष्कर, तालिबान आणि हिज्बूलच्या कमांडर्सबरोबर बैठक झाल्याचे, भारतीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलांनी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. याबाबत पहिली बैठक 27 डिसेंबरला झाली होती. यामध्ये लष्करची संस्थापक संघटना जमात उद दावाचा सरचिटणीस आमिर हमलाने जैशच्या कमांडरसोबत बहालपूर येथे बैठक घेतली होती. भारताविरोधात मोहिमेला वेग आणण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

हेही वाचा- coronavirus: अर्धी लोकसंख्या फेब्रुवारीपर्यंत बाधित; सरकारी समितीचा अंदाज

त्यानंतर 3 ते 8 जानेवारी आणि 19 जानेवारी रोजी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांमध्येही बैठका झाल्या. यामध्ये जागतिक स्तरावर दहशतवादी संघटना घोषित करण्यात आलेल्या समूहांचे कमांडरही सहभागी झाले होते. यामध्ये जैशचा अघोषित प्रमुख मुफ्ती रऊफ असगर, जैशचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ मौलाना अम्मार, लष्करचा कमांजर जाकिउर रहमान लख्वी आणि आमिर हमजाही सहभागी झाले होते. 

या बैठकीत दहशतवादी संघटनांनी शस्त्रास्त्रे आपापसांत वाटण्यासाठी आणि लपून बसलेल्या समर्थकांना मदत करण्यावर, हिज्बूलला काश्मीरमधील सर्व हल्ल्यांची जबाबदारी देण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan work assigned to Jaish Lashkar and Hizbul for terror in Kashmir