नितीश कुमारांनी चिराग यांच्यावर अन्याय केला; तेजस्वींच्या सहानुभूतीने नव्या चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

याआधी लोकजनशक्ती पार्टी ही भाजपचीच B टिम आहे, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली होती.

नितीश कुमार हे तरुण नेतृत्वाला बेदखल करतात तसेच त्यांनी तरुणांवर अन्याय केला आहे, असं वक्तव्य लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होतं. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी चिराग पासवान यांच्या या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. याआधी लोकजनशक्ती पार्टी ही भाजपचीच B टिम आहे, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली होती. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य समोर आल्याने राजद आणि लोजपाबाबतच्या चर्चेला नवं वळण फुटलं आहे. 

महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणारे तेजस्वी यादव यांनी नुकतंच पितृशोक झालेल्या चिराग पासवान यांच्याबाबत काही वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले की, नितीश कुमारांनी चिराग यांच्यावर अन्याय केला आहे. जे नितीश कुमारांनी चिराग यांच्यासोबत केलं ते योग्य नव्हतं. आज रामविलास पासवान आपल्यात नाहीयेत, मात्र चिराग पासवान यांना आधीपेक्षा आपल्या वडीलांची जास्त गरज आहे. नितीश कुमारांचं वागणं अन्यायी होतं आणि त्यांनी चिराग पासवानांसोबत अन्याय केला आहे.

हेही वाचा - Corona Update : आकडे घसरतायत; सोमवारी 60 हजारहून कमी रुग्ण; मात्र काळजी गरजेचीच !

चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान यांचा 8 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. जेडीयू पक्षासोबत असलेल्या मतभेदांना पुढे करत लोकजनशक्ती पार्टीने एनडीएसोबत राज्यात निवडणुक न लढवण्याचा पवित्रा घेतला. मात्र, भारतीय जनता पार्टीशी एकाबाजूला केंद्रात सख्य आणि दुसऱ्या बाजूला जेडीयूविरोधात लढाई अशी लोजपाची भुमिका राहीली आहे. लोजपाने असेही जाहीर केले आहे की, निवडणुकीनंतर भाजपा आणि लोजपा यांचं एकत्रित सरकार राज्यात सत्तेवर येईल. गेल्या रविवारी तेजस्वी यादव यांनी लोजपाच्या या धोरणी पवित्र्यावर सडकून टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की हे व्होट कटूआ (मत खाणारे) आहेत. आणि त्यांनी मतदारांना सांगितलं होतं की लोजपा ही भाजपचीच B टीम आहे आणि पुढे त्यांनी आवाहनही केलं होतं की भाजपाच्या B टिमपासून सावध रहा.

हेही वाचा - कृषी विधेयकाची प्रत न मिळाल्यामुळे आप आमदारांनी विधानसभेत घालवली रात्र

 मात्र लोजपाने तेजस्वी यादव यांच्या नितीश कुमारांवर टीका करणाऱ्या वक्तव्याला दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानले आहेत. लोजपाचे प्रवक्ता अश्रफ अन्सारी यांनी म्हटलं की, सगळेजणच चिराग पासवानांच्या त्या वक्तव्याशी सहमत आहेत. तेजस्वी यादव आणि चिराग पासवान दोघेही पहिल्यांदाच ही निवडणुक आपापल्या वडीलांच्या अनुपस्थितीत लढत आहेत. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव  हे तुरुगांत असून ते निवडणुकीत सहभागी होऊ शकत नाहीत तर रामविलास पासवान यांच्या जाण्याने लोजपाचे भरुन न येणारे नुकसान झाले आहे. तेजस्वी यादव यांच्या सहानुभूतीपुर्ण वक्तव्याने आता नव्या शंका-कुशंकांना वाटा फुटल्या आहेत. निवडणुकीत राजद आणि लोजपा एकत्र येऊ शकतील का, असाही अंदाज वर्तवला जातोय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RJD Tejshwi Yadav Supported Chirag Paswans statement over nitish kumar