पाकिस्तानच्या संशयित एजंटला अटक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

इस्लामाबादमध्ये असताना पैशासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याचा कन्यालवर आरोप आहे. त्याच्याकडून एक पाकिस्तानी "क्‍यू-मोबाईल' फोन जप्त करण्यात आला आहे. हा फोन त्याला भारतात परतल्यानंतर आयएसआयने संपर्क साधण्यासाठी दिला होता. या मोबाईलमधील डेटावरून खरे सत्य बाहेर येईल, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कन्यालला डॉलरच्या स्वरूपात पैसे दिले जात होते आणि भारतात आल्यानंतर तो दिल्लीमध्ये डॉलरचे रूपांतर भारतीय रुपयांत करून हे पैसे गावी घेऊन जात असे.

लखनौ/पिथोरागड, ता. 24 (पीटीआय) : पाकिस्तानमध्ये एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी काम केलेल्या "आयएसआय'च्या (पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा) संशयित एजंटला आज उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. 
रमेश सिंह कन्याल असे या एजंटचे नाव असून, त्याला उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यातील दिदिहात भागातून त्याच्या घरातून अटक केली. त्याच्यावर हेरगिरीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याने 2015-2017 या काळात इस्लामाबादमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी आचारी म्हणून काम केले होते आणि याच काळात तो आयएसआयच्या संपर्कात आला, अशी माहिती लखनौ आणि पिथोरागडमधील अधिकाऱ्यांनी दिली. 
कन्यालने राष्ट्रविरोधी कारवायांमधील त्याच्या सहभागाची कबुली दिली असल्याचेही उत्तर प्रदेश एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीसाठी त्याला लखनौला घेऊन जाण्यात आल्याचे पिथोरागडचे पोलिस अधीक्षक रामचंद्र राजगुरू यांनी सांगितले. 

पाकिस्तानी मोबाईल जप्त 
इस्लामाबादमध्ये असताना पैशासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याचा कन्यालवर आरोप आहे. त्याच्याकडून एक पाकिस्तानी "क्‍यू-मोबाईल' फोन जप्त करण्यात आला आहे. हा फोन त्याला भारतात परतल्यानंतर आयएसआयने संपर्क साधण्यासाठी दिला होता. या मोबाईलमधील डेटावरून खरे सत्य बाहेर येईल, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कन्यालला डॉलरच्या स्वरूपात पैसे दिले जात होते आणि भारतात आल्यानंतर तो दिल्लीमध्ये डॉलरचे रूपांतर भारतीय रुपयांत करून हे पैसे गावी घेऊन जात असे.

Web Title: Pakistan's suspected agent arrested