
एकप्रकारे कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचाच निर्धार राकेश टिकैत यांनी बोलून दाखवला आहे.
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत या ठिकाणी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही शेतकरी निर्धारासह धरणे धरुन आहेत. काल दिल्ली पोलिसांनी या आंदोलनस्थळी उभारलेल्या भयानक अशा बॅरिकेडींगचे फोटो समोर आले होते. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. मात्र भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मात्र आंदोलनाचा जोर तसाच राहिल, असं जाहीर केलं आहे.
हेही वाचा - आंदोलक शेतकऱ्यांचे भयानक हाल; बॅरिकेडींगमुळे शौचालयाची गैरसोय, पाण्याची टंचाई
काल झारखंडचे कृषीमंत्री बादल पत्रलेख गाझीपूरच्या सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घ्यायला आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, या आंदोलनाच्या सुरवातीपासूनच आम्ही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आहोत. मी इथे नैतिक पाठिंबा द्यायला आलोय. दिल्ली पोलिस हे केंद्र सरकारच्या हातातील कळसुत्री बाहुल्या आहेत, असं कृषीमंत्र्यांनी म्हटलं. यावेळी राकेश टिकैत यांनी म्हटलं की, आम्ही सरकारला ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा वेळ दिला आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर 40 लाख ट्रॅक्टरसह आम्ही देशव्यापी ट्रॅक्टर रॅली काढू. एकप्रकारे कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचाच निर्धार राकेश टिकैत यांनी बोलून दाखवला.
We have given the govt time till October. If they do not listen to us, we will go on a pan-country tractor rally of 40 lakh tractors: Rakesh Tikait, BKU leader https://t.co/NFt3m5yrwa pic.twitter.com/VA0v9HC6CB
— ANI (@ANI) February 2, 2021
दरम्यान, सरकारने उभ्या केलेल्या बॅरिकेडींगमुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. शेतकऱ्यांना नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आंदोलकांना दिल्ली जल बोर्डाच्या पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहोचयला अडचण निर्माण होत असल्याने पाण्याची टंचाई होत आहे. तसेच शेतकऱ्यांना मोबाईल टॉयलेट्सच्या ठिकाणी देखील पोहोचणे कठीण होत आहे.
दिल्ली पोलिसांनी याआधी वीज आणि पाण्याची सेवा खंडीत केली होती. तसेच इंटरनेटची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता काल उभारण्यात आलेले बॅरिकेडींगमुळे सरकारबद्दल रोष आहे. सध्या आंदोलनस्थळी कमी मोबाईल टॉयलेट्स असल्याने शेतकरी आंदोलकांची गैरसोय होत आहे. शौचालयांची संख्या आणि शेतकऱ्यांची संख्या यामुळे शौचालय वापरण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ वाट पहावी लागत आहे. अनेकांना उघड्यावर शौचाला जावे लागत असून महिलांचीही गैरसोय होत आहे.