पनीरसेल्वम यांच्या पाठीशी 'दस का दम'

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

अण्णा द्रमुकमधील घडामोडींबाबत मला काहीही बोलायचे नाही; पण राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज नसल्याचे मला वाटते.

- विजयकांत, "डीएमडीके'चे प्रमुख

 

शशिकला यांच्याकडे बहुमत असल्याने राज्यपालांनी त्यांनाच सरकार स्थापनेसाठी बोलवावे. आमचे आमदार राज्यपाल आणि राष्ट्रपतींसमोर जाण्यास तयार आहेत.

- वैथीलिंगम, अण्णा द्रमुकचे खासदार

चेन्नई : तमिळनाडूतील अंतर्गत सत्तासंघर्षामध्ये बळाचा राजकीय लंबक आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे झुकू लागला असून, अण्णा द्रमुकमधील आणखी पाच खासदारांनी त्यांच्या गोटात प्रवेश केला आहे. यामुळे पनीरसेल्वम यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या दहावर पोचली आहे. जयसिंह थियागाराज नॅट्टर्जी (तुतीकोरिन), सेंगुत्तुवन (वेल्लोर), आर. पी. मारूथाराजा (पेरूम्बलूर) आणि एस. राजेंद्रन (वेल्लूपुरम) यांनी आज पनीरसेल्वम यांची त्यांच्या "ग्रीनवेज' या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.

दरम्यान, शशिकला यांच्या गटातील आमदार आणि खासदार फुटू लागल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. शशिकला यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी "गोल्डन बे रिसॉर्ट'वर जाऊन समर्थक आमदारांची भेट घेतली. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकारणामध्ये टिकाव धरणे महिलांसाठी अधिक आव्हानात्मक असते, असे भावनिक मत मांडत, पुढील साडेचार वर्षे राज्यात आमचेच सरकार असेल, असा विश्‍वास व्यक्त केला. शशिकला यांच्या गटातील आणखी अकरा आमदार जर पनीरसेल्वम यांना जाऊन मिळाले, तर चिन्नम्मांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगू शकते. शशिकला यांच्या गटाने आपल्याकडे 127 आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला आहे. तत्पूर्वी शशिकला यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरीसुद्धा राज्यपाल मात्र त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते.
 

पाठिंब्याचे नैतिक बळ
राज्यसभा खासदार आर. लक्ष्मणन यांनीही पनीरसेल्वम यांचा झेंडा खांद्यावर घेतल्याने त्यांचे नैतिक बळ आणखी वाढले आहे. अण्णा द्रमुकचे लोकसभेत 37, तर राज्यसभेमध्ये तेरा खासदार आहेत. व्ही. मैत्रियन यांनी सर्वप्रथम पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला होता. माजी आमदार बादेर सय्यद आणि मुथूसेल्वी यांनीही पनीरसेल्वम यांना आज पाठिंबा जाहीर केला. टॉलिवडूही आता पनीरसेल्वम यांच्या पाठीशी उभे राहताना दिसते. जयललिता यांचे निष्ठावंत रामाराजन आणि थियागू यांच्या व्यतिरिक्त कलाकार आणि दिग्दर्शक अरुण पांडियन यांनीही पनीरसेल्वम यांनाच पाठिंबा दिला आहे.

राज्यपाल ठाम राहणार
राज्यात सत्ता स्थापनेस राज्यपालांकडून पर्यायाने केंद्र सरकारकडून विलंब केला जात असल्याचा आरोप शशिकला यांनी केला असून, त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. राज्यपाल मात्र शशिकला यांच्या धमकीला भीक घालण्याची शक्‍यता कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यामध्ये स्थिर सरकार आणणे ही राज्यपालांची जबाबदारी असल्याने, ते शशिकला यांना आमंत्रण देण्याची घाई करताना दिसत नाहीत.

महत्त्वाच्या घडामोडी
माजी मंत्री जयपाल, पुनातची यांचा पनीरसेल्वम यांना पाठिंबा
दिलीप रामचंद्रन यांचाही पनीरसेल्वम यांना पाठिंबा
प्रदेश भाजप राज्यपालांच्या पाठीशी
"द्रमुक'ची सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक
हॉकीपटू बास्करन यांचा पनीरसेल्वम यांना पाठिंबा
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चेन्नईमध्ये तणाव

Web Title: paneerselvam gets support of ten aiadmk leaders