esakal | परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संसदेत गोंधळ; राज्यसभेचं कामकाज तहकूब
sakal

बोलून बातमी शोधा

lok sabha

परमबीर सिंग यांच्या पत्रावर लोकसभेतही चर्चा झाली. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांमध्ये खडाजंगीही झाली. यावेळी खासदार गिरीष बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संसदेत गोंधळ; राज्यसभेचं कामकाज तहकूब

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - राज्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून मोठा गोंधळ सुरु असताना संसदेतही याचे पडसाद उमटले. परमबीर सिंग यांच्या पत्रावर लोकसभेतही चर्चा झाली. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांमध्ये खडाजंगीही झाली. यावेळी खासदार गिरीष बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील पोलिस खंडणी मागत असल्याचंही बापट लोकसभेत म्हणाले. याशिवाय खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक होत ठाकरे सरकारवर आरोप केले. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांमुळेच हे सर्व होत असून याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, परमबीर सिंगांच्या पत्रावरील चर्चेमुळे गोंधळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. 

100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेण्याची ही देशातील ही पहिलीच घटना असेल असं भाजप खासदार राकेश सिंह यांनी म्हटलं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत म्हटलं की, गृहमंत्रीच वसुली करत आहेत आणि सगळ्या देशाने हे पाहिलं आहे. तसंच एका महिन्याचे 100 कोटी , वर्षाचे किती आणि 5 वर्षाच्या कार्यकाळात किती  कमावत असतील असा सवाल पूनम महाजन यांनी केला. 

हे वाचा - काँग्रेस नेत्यानेच मागितला देशमुखांचा राजीनामा, त्यावर सचिन सावंत म्हणतात...

खासदार नवनीत राणा यांनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. परमबीर सिंग यांची बदली सचिन वाझेमुळे करण्यात आली. महाराष्ट्रात जे काही घडतंय त्यामागे मुख्यमंत्र्यांचा हात आहे आणि त्याला सर्वस्वी मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. फक्त मुंबईतून शंभर कोटींची वसुली होत असेल तर महाराष्ट्रातून किती वसुली केली जात असेल असा प्रश्नही नवनीत राणा यांनी विचारला. 

हे वाचा - मुंबई पोलिसांना आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल - सुधीर मुनगंटीवार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आरोप परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता. या पत्रावरून राज्यात ठाकरे सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.  परबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहखात्यातील काही मोठे अधिकारीसुद्धा उपस्थित असणार आहेत. 

हे वाचा - कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी, पाच महिन्यातील सर्वाधिक वाढ

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, अनेक आरोप होत असतात आणि प्रत्येक आरोपानंतर राजीनामा दिला तर सरकार चालवणं कठीण होऊन जाईल. राजीनामा घ्यायचा की नाही हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. विरोधकांच्या आरोपानंतर राजीनामा घेतला तर अर्धं मंत्रिमंडळ रिकामं होईल. 

loading image