संसद भवनाला एलईडी दिव्यांची झळाळी! पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्‌घाटन;

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 August 2019

जावडेकर यांचा निर्णय
तत्कालीन पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या रोषणाईसाठी येणारे कोट्यवधी रुपयांचे बिल पाहिल्यावर या रोषणाईसाठी एलईडी बल्ब लावण्याचा निर्णय अमलात आणला होता. यामुळे विजेच्या खर्चात तब्बल पंचाहत्तर टक्‍क्‍यांची बचत होत असल्याचे दिसून आले. भाजप-२ सरकारमध्ये जावडेकर यांच्याकडे पुन्हा पर्यावरण मंत्रालयाचा पदभार आल्यावर त्यांनी यासाठी रंगीत बल्ब असावेत, ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले. राज्यसभाध्यक्ष व लोकसभेचे सभापती यांच्यासह दोन्ही सचिवालयांशी चर्चा करून ही योजना अमलात आणण्यात आली आहे. नव्या प्रकाश योजनेची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. मोदी यांच्या हस्ते उद्या त्याचे रीतसर उद्‌घाटन होणार आहे.

नवी दिल्ली - संसद भवनाची भव्य व ऐतिहासिक वास्तू आता नव्या रोषणाईने झळाळणार आहे. संसदेच्या गोलाकार भवनाला केलेली रोषणाई बदलण्यात आली असून, नव्या प्रकाश यंत्रणेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्या (ता. १३) सायंकाळी यांच्या हस्ते होणार आहे. नव्या रचनेत ८७५ एलईडी बल्बचा वापर करण्यात आला आहे. संसद भवनाची इमारत जुनी झाल्याने देखभाल-दुरुस्ती वारंवार करावी लागते.

त्यासाठी नव्या संसद भवनाची निर्मिती करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नव्या संसदेत अधिवेशन भरवावे अशी मूळ कल्पना आहे. लोससभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेत याबाबत नुकतेच सूतोवाच केले. राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी नवीन इमारत बांधण्याबरोबरच सध्याच्या इमारतीच्या मजबुतीकरणाच्या शक्‍यता पडताळून पाहण्याची सूचना केली आहे. त्याबाबत पंतप्रधानांनी कोणताही निर्णय घेतला तरी किमान २०२२ पर्यंत सध्याच्याच संसद भवनात अधिवेशने होणार हे निश्‍चित आहे. त्यादृष्टीने नव्या विद्युत रोषणाईची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यांसारख्या विशिष्ट दिवसांना संसद भवनाच्या बाह्य भागाच्या सर्व बाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात येते. सायंकाळी सात वाजल्यापासून संसद भवन झगमगून गेलेले असते व खास हे दृश्‍य पाहण्यासाठी लोक आजूबाजूच्या परिसरांत गर्दी करतात. १९२९ मध्ये या वास्तूची रचना करताना ब्रिटिशांनी सर्व बाजूंना अतिशय भव्य अशा दगडी खांबांची रचना केली आहे. संसदेचे छत व या खांबांना ही रोषणाई केली जाते. यापूर्वी यासाठी सुमारे ९०० साधे बल्ब वापरले जात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parliament LED lamp Lighting Prakash Jawadekar Narendra Modi