गृहमंत्री अमित शहांचे अकाउंट ब्लॉक का केलं? संसदीय समितीनं ट्विटरला धरलं धारेवर

सकाळ ऑनलाइन टीम
Friday, 22 January 2021

यावरुन समितीतील सत्ताधारी सदस्यांनी टि्वटरच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते.  

नवी दिल्ली- गुरुवारी फेसबुक आणि टि्वटरच्या अधिकाऱ्यांना संसदीय समितीच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. नोव्हेंबर महिन्यात गृहमंत्री अमित शहा यांचे अकाऊंट ब्लॉक का केलं ? असा जाब संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान स्थायी समितीने टि्वटरला विचारला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संसदेच्या स्थायी समितीने नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण, सोशल मीडियाचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि डिजीटल जगतात महिलांच्या सुरक्षेवरुन फेसबुक, टि्वटर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत वेगवेगळ्या बैठका घेतल्या. 

शहा यांचं टि्वटर अकाऊंट बंद झाल्यानंतर टि्वटरने स्पष्टीकरण देताना हे तांत्रिक कारणामुळे झाले असून त्यात सुधारणा केल्याचे म्हटले होते. यावेळी समितीतील एका सदस्याने भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दलही टि्वटरला प्रश्न विचारला. शहा यांचे टि्वटर अकाऊंट बंद करण्यासाठी त्यांना कोणी आदेश दिला होता का? असा सवालही विचारण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. 

हेही वाचा- मराठमाेळ्या महिला शेतकऱ्यांनी सहारनपूर बॉर्डर दणाणून सोडली

यावर टि्वटरच्या अधिकाऱ्यांनी फोटोबाबत कॉपीराइटची समस्या होती, त्यामुळे शहा यांचे अकाऊंट काही काळासाठी थांबवण्यात आल्याचे सांगितले. हे प्रकरण समोर आल्यानंतर टि्वटरच्या एका प्रवक्त्याने म्हटले होते की, शहा यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय लगेच मागे घेण्यात आला. आता हे अकाऊंट सुरु आहे. दरम्यान, यावरुन समितीतील सत्ताधारी सदस्यांनी टि्वटरच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते.  

टि्वटर आणि फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी कंटेटबाबत त्यांचे काही नियम आणि व्यवस्था असल्याचे समितीला सांगितले. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर हिंसाचार करण्यासाठी होऊ नये, हे निश्चित करुन कंटेट हटवणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्या, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट बंद केले आहे. सहा जानेवारी रोजी केलेल्या टि्वटमुळे कॅपिटॉलमध्ये हिंसाचार उसळल्याचे बोलले जाते. त्यामुळे ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यात आले आहे. 
हेही वाचा- काँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parliamentary panel members raise issue of Twitter blocking Amit Shahs account