मराठमाेळ्या महिला शेतकऱ्यांनी सहारनपूर बॉर्डर दणाणून सोडली

सिद्धार्थ लाटकर
Friday, 22 January 2021

महिला किसान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या पाच महिलांच्या हस्ते जमिनीमध्ये बाण रोवून सांकेतिक पद्धतीने उद्‌घाटन करून पाठिंबा दर्शविला.

सातारा : दिल्लीत सुरु असलेल्या किसान आंदोलनात महाराष्ट्रातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. लोकसंघर्ष मोर्चा व लेक लाडकी अभियान या दोन संस्थांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने तेथे मेळावा आयोजित केला आहे.

यामध्ये १५ जानेवारीस सर्व आंदाेलक दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर १७ जानेवारीपासून दिल्लीतील आंदोलनात सर्वजण सामील झाले आहेत. तसेच १८ जानेवारी हा महिला किसान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा यांच्या नावाचा जयघोष करत सहारनपूर बॉर्डर दणाणून सोडली.

महाराष्ट्राचा पारंपरिक वेष परिधान करून महिला वाद्यांच्या ताला-ठेकात आंदोलनस्थळी फेरीने पोहोचल्या. या पूर्ण कार्यक्रमात राजस्थान, हरयाणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब येथील तीन हजार महिला शेतकरी सामील झाल्या होत्या.

कार्यक्रमामध्ये प्रतिभा पाटील, अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांची भाषणे झाली. वर्षा देशपांडे यांनी शेतीची सुरुवात कशाप्रकारे महिलांनी केली हे सांगितले आणि महिलांची ताकद सरकारने समजून घ्यावी, नाही तर त्याची सरकारला किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशारा दिला. प्रतिभाताईंनी शेतीमधल्या महिलांच्या योगदानाबद्दल तसेच शेतीसंबंधी होणाऱ्या चर्चेत, निर्णयात महिलांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आणि शेतकरी महिलांच्या व्यथा आणि त्यांचा राग मांडला.

कार्यक्रमावेळी सामूहिकरीत्या ठराव मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तीनही काळे कायदे रद्द होईपर्यंत लढाई सुरू ठेवण्याचा ठराव त्यांनी मांडला. त्याचप्रमाणे सर्व शेतकरी महिला व पुरुषांनी संघटितपणे आंदोलनाच्या शेवटपर्यंत व आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सोबत राहण्याचा निर्धार या ठरावात केला. आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण प्रतिनिधित्व देशातील विविध भागांतून आलेल्या महिलांद्वारे करण्यात आले.दिल्लीत कडाक्याच्या थंडीत सलग दोन महिने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून महिलांनी जाण्याचा हिय्या केला. गनिमी काव्याने आंदोलनस्थळावर पोहोचल्यानंतर महिला या आंदोलनात सहभागी झाल्या. महिला किसान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या पाच महिलांच्या हस्ते जमिनीमध्ये बाण रोवून सांकेतिक पद्धतीने उद्‌घाटन करून पाठिंबा दर्शविला.

रानगव्यांचा कासला पुन्हा गव गवा

मंत्रालयातील निलंबित अव्वल सचिव खाताेय कोठडीची हवा

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens From Maharashtra Participated In Farmer Protests Delhi Satara Marathi News