पातालपानी बनले तंट्या भिल्ल रेल्वे स्थानक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पातालपानी बनले तंट्या भिल्ल रेल्वे स्थानक
पातालपानी बनले तंट्या भिल्ल रेल्वे स्थानक

पातालपानी बनले तंट्या भिल्ल रेल्वे स्थानक

भोपाळ : नामांतराच्या माध्यमातून राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे धोरण भाजपने कायम ठेवले असून मध्य प्रदेशात याची आणखी एकदा अंमलबजावणी करण्यात आली. इंदूरजवळील पातालपानी रेल्वे स्थानकाला तसेच इंदूरमधील दोन ठिकाणांना आदिवासी क्रांतिकारक तंट्या भिल्ल यांचे नाव देण्यात आले.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही घोषणा केली. भंवर कुवा मध्यवर्ती परिसर तसेच एमआर १० बस स्थानक ही ठिकाणे तंट्या भिल्ल यांच्या नावाने ओळखली जातील. बस स्थानकाच्या विस्तार आणि नूतनीकरणासाठी ५३ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सुरु आहे. नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाईल. आदिवासींविरुद्धचे क्षुल्लक आणि खोटे खटले मागे घेतले जातील. आदिवासी तरुणांना लष्करात भरती होता यावे म्हणून प्रशिक्षण दिले जाईल.

काँग्रेसवर टीका

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही घोषणा करतानाच काँग्रेसला लक्ष्य केले. स्वातंत्र्याचे श्रेय काँग्रेस केवळ एका घराण्याला देत असल्याची टीका त्यांनी केली. नुकतेच भोपाळजवळील हबीबगंज रेल्वे स्थानकाला आदिवासी राणी कमलापती यांचे नाव देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. तेव्हा जनजातीय गौरव सप्ताह सुरु झाला होता. त्याची सांगता आणखी एका नामांतराने झाली.शिवराजसिंह यांनी सांगितले की, आदिवासींच्या इतिहासाकडे आधीच्या सरकारांनी दुर्लक्ष केले. देशातील तसेच मध्य प्रदेशातील आदिवासी जमातींचा इतिहास वैभवशाली आहे. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ब्रिटिशांनी आपल्या जमातींचा स्वाभीमान नष्ट केला. आता राज्य सरकार तो पुन्हा निर्माण करेल.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

"गोंडवाना साम्राज्याने मुघलांविरुद्धचा लढा तसेच स्वातंत्र्य चळवळीत बहुमोल योगदान दिले, पण हा इतिहास योग्य पद्धतीने शिकविला जात नाही. इतिहासच चुकीच्या पद्धतीने शिकविला जातो. केवळ एकाच घराण्याची चर्चा केली जाते आणि नेहरूजी, इंदिराजी यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगितले जाते. राजा शंकर शहा, रघुनाथ शहा, तंट्या भिल्ल, भीमा नायक अशा आदिवासी लोकनायकांच्या योगदानाबद्दल कधीही सांगितले जात नाही."

- शिवराजसिंह चौहान

कोण होता तंट्या भिल्ल

तंट्या भिल्ल यांना भारतीय रॉबिनहूड म्हणून ओळखले जाते. धनुष्यबाण आणि भालाफेकीत ते तरबेज होते. त्यांनी तब्बल एक तप ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. ते सावकार तसेच ब्रिटिशांचा खजिना लुटत आणि गोरगरिबांना वाटून टाकत असत. ब्रिटिशांनी त्यांना लुटारू ठरविले, पण महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील परिसरात त्यांना देवदूत मानले जायचे.

loading image
go to top