रुग्णालयाच्या बिलासाठी त्यांनी आणली 40 हजार रुपयांची चिल्लर!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सुकांताचा भाऊ स्नेहाशिष म्हणाला, 'आम्ही रुग्णालय प्रशासनाला जुन्या नोटा किंवा धनादेश स्वीकारण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही चिल्लर गोळा करण्याचा निर्णय घेतला. चिल्लर गोळा करून अवघड होते. मात्र अशक्‍य नव्हते.' तर मित्र आणि नातेवाईकांनी त्यांच्या मुलांच्या सेव्हिंग बॉक्‍समधील चिल्लर काढून आम्हाला रात्री उशिरापर्यंत आणून दिल्याची माहिती तापस रॉय या नातेवाईकाने दिली.

कोलकाता - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी एका रुग्णाने चक्क 40 हजार रुपयांची चिल्लर दिल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या सहा कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास ही चिल्लर मोजून जमा करून घेतली. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

न्यु अलिपोरा येथील बीपी पोद्दार रूग्णालयात डेंग्यु झालेल्या सुकांतावर उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाने 40 हजार रुपयांचे बिल झाल्याचे तिच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र नातेवाईकांकडे केवळ 500 आणि हजार रुपयांच्याच नोटा होत्या. त्या स्विकारण्यास रुग्णालया प्रशासनाने नकार दिला. त्यानंतर नातेवाईकांनी धनादेशाने बिल जमा करण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यासही रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यावरून नातेवाईक त्रस्त झाले. त्यांनी व्हॉटसऍपद्वारे आपल्या मित्र आणि नातेवाईकांना पैसे जमा करण्याचे सांगितले. बुधवारी रात्री आवाहन केल्यानंतर गुरुवारच्या पहाटे तीन वाजता त्यांच्याकडे चिल्लर स्वरुपात 40 हजार रुपये जमा झाले. गुरुवारी सकाळी ही सारी चिल्लर घेऊन नातेवाईक रुग्णालयात आले. मात्र रुग्णालयाने चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आणि डिमांड ड्राफ्टने बिल जमा करण्यास सांगितले. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नातेवाईकांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि त्यांनी या प्रकाराबद्दल पोलिसांकडे तक्रार देण्याचा इशारा दिला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने चिल्लर घेण्यास होकार दिला. त्यानंतर रुग्णालयाचे सहा कर्मचारी तब्बल तीन तास 40 हजार रुपयांची चिल्लर मोजत होते. चिल्लर मोजून झाल्यानंतर बिल जमा करून घेत रुग्णालयाने सुकांताला डिस्चार्ज दिला.

याबाबत बोलताना सुकांताचा भाऊ स्नेहाशिष म्हणाला, 'आम्ही रुग्णालय प्रशासनाला जुन्या नोटा किंवा धनादेश स्वीकारण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही चिल्लर गोळा करण्याचा निर्णय घेतला. चिल्लर गोळा करून अवघड होते. मात्र अशक्‍य नव्हते.' तर मित्र आणि नातेवाईकांनी त्यांच्या मुलांच्या सेव्हिंग बॉक्‍समधील चिल्लर काढून आम्हाला रात्री उशिरापर्यंत आणून दिल्याची माहिती तापस रॉय या नातेवाईकाने दिली.

Web Title: Patient settles Rs 40,000 hospital bill in coins