बाबू जगजीवनराम यांच्या गावात संघाच्या पाऊलखुणा

उज्ज्वलकुमार
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

ट्‌विट
मुँह में राम, दिमाग में नथुराम, तभी तो बना पलटूराम
लालूप्रसाद यादव, "राजद'चे अध्यक्ष
(नितीश, सरसंघचालक संभाव्य भेटीबाबत)

सरसंघचालक मोहन भागवत करणार कार्यालयाचे भूमिपूजन

पाटणा : माजी उपपंतप्रधान आणि प्रसिद्ध दलित नेते बाबू जगजीवनराम यांच्या भोजपूर जिल्ह्यातील चंडवा गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय उभारले जाणार आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात येईल. सध्या याच गावामध्ये आंतरराष्ट्रीय महाधर्म संमेलन होत आहे.

चंडवा हे गाव पाटण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे याच गावात जगजीवनराम यांची समाधी आहे. मृत्यूनंतर येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. जगजीवनराम यांचे शालेय शिक्षण चंडवामध्येच झाले होते. येथे शिक्षण घेतानाच त्यांना अस्पृश्‍यतेचे चटकेही सहन करावे लागले. सवर्णांच्या त्रासामुळे बाबूजींना शाळेतील शेवटच्या बाकावर बसावे लागत असे. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. जगजीवनराम यांच्या स्पर्शाने विटाळ होईल या भीतीने विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वेगळ्या खानावळीची मागणी केली होती. या वेळी पं. मदनमोहन मालवीय यांनी पुढाकार घेत जगजीवनराम यांची बाजू घेतली होती. दरवर्षी येथे जगजीवनराम यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांना जगजीवनराम यांच्या कन्या मीरा कुमार आवर्जून उपस्थित राहतात. आता याच गावामध्ये संघाचे कार्यालय उभे राहणार आहे.

नितीश, भागवत एकत्र
चंडवा गावामध्ये आचार्य रामानुज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या (ता.4) रोजी याचा समारोप होतो आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान दोघांच्या भेटीस अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. संयुक्त जनता दलानेही याबाबत मौन बाळगणे पसंत केले आहे.

Web Title: patna news rss footsteps in Babu Jagjeevanam's village